एक दिवसीय संपाने ६० लाखांचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2021 01:29 IST2021-10-30T01:28:40+5:302021-10-30T01:29:33+5:30
महागाई आणि घरभाडे भत्त्यासह विविध मागण्यांसाठी कर्मचारी संघटनांच्या कृती समितीच्यावतीने पुकारण्यात आलेल्या संपावर तोडगा निघाल्यानंतर गुरुवारी रात्री ९ वाजताच ठक्कर बसस्थानातून पुण्याकडे पहिली बस धावली. त्यानंतर रात्री अहमदाबाद बस रवाना करण्यात आली. शुक्रवारपासून सर्व आगारातील बसेस सुरळीत सुरू झाल्या. दरम्यान, एक दिवसीय संपामुळे नाशिक विभागाला सुमारे ६० लाखांचा फटका बसला आहे.

एक दिवसीय संपाने ६० लाखांचा फटका
नाशिक: महागाई आणि घरभाडे भत्त्यासह विविध मागण्यांसाठी कर्मचारी संघटनांच्या कृती समितीच्यावतीने पुकारण्यात आलेल्या संपावर तोडगा निघाल्यानंतर गुरुवारी रात्री ९ वाजताच ठक्कर बसस्थानातून पुण्याकडे पहिली बस धावली. त्यानंतर रात्री अहमदाबाद बस रवाना करण्यात आली. शुक्रवारपासून सर्व आगारातील बसेस सुरळीत सुरू झाल्या. दरम्यान, एक दिवसीय संपामुळे नाशिक विभागाला सुमारे ६० लाखांचा फटका बसला आहे.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच भत्ते आणि वेतन मिळावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे विभागातील १३ डेपोंमधील सुमारे ४०० पेक्षा अधिक बसेस थांबल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले तर अनेक प्रवाशांना स्थानकावरच अकडून पडावे लागले होते. सायंकाळी संपावर तोडगा निघाल्यानंतर कर्मचारी कामावर परतले, मात्र रात्री नाशिकमधून पुणे आणि अहमदाबाद या बसेस रवाना करण्यात आल्या. संप मिटल्यानंतरही काही कर्मचारी मात्र कामावर हजर न होता संप सुरूच असल्याचा दावा करीत राहिल्याने प्रत्यक्ष काम सुरू होण्यासही विलंब झाला.
कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारल्याने सर्वच्या सर्व १३ डेपेांचे कामकाज बंद होते. सर्व बसेस स्थानकातच उभ्या हेात्या. सायंकाळी संप मिटल्यानंतर दुसऱ्या दिवशी बसेस मार्गावर आल्या. महामंडळाला दरमहा सुमारे ६० ते ६२ लाखांचे उत्पन्न मिळते, त्यामुळे एका दिवसाच्या संपामुळे महामंडळाला लाखोंचा फटका बसला तर दुसऱ्या दिवशीदेखील गाड्या विलंबाने धावल्याने त्याचाही फटका बसणार आहे.
--इन्फो--
कळवण आगार बंदच
जिल्ह्यातील सर्व आगारे खुली झाली असली तरी कळवण आगारात मात्र कर्मचऱ्यांनी कामबंद आंदोलन कायम ठेवले. महागाई भत्ता आणि घरभाडे या मागणीबरोबरच महामंडळाचे शासनात विलीनीकरण व्हावे, अशी देखील एक मागणी असल्याचा दावा करीत याबाबत कोणताही निर्णय न झाल्याने संप कायम असल्याची भूमिका घेतल्याने दुसऱ्या दिवशीदेखील कळवण आगार पूर्णपणे बंद होते. पंचवटीतील डेपोतही चालकांनी सायंकाळी गाड्या बाहेर काढण्यास मनाई केली. सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित करीत अनेकांनी गाड्या थांबविल्या. त्यांची समजूत काढण्यासाठी सायंकाळ झाली. त्यानंतर काही गाड्या रवाना झाल्या.