५६ खेडी वाढीव पाणी योजनेला मंजुरी
By Admin | Updated: June 10, 2017 01:15 IST2017-06-10T01:14:53+5:302017-06-10T01:15:04+5:30
वाढीव पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यास पाणीपुरवठामंत्री लोणीकर यांनी मंजुरी देत त्यासाठी सुमारे ८० ते १०० कोटींची तरतूद ठेवण्यास मंजुरी दिल्याची माहिती अर्थ सभापती मनीषा रत्नाकर पवार यांनी दिली.

५६ खेडी वाढीव पाणी योजनेला मंजुरी
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत असलेली नांदगाव ५६ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे पुनर्नियोजन करून वाढीव पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यास पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी मंजुरी देत त्यासाठी सुमारे ८० ते १०० कोटींची तरतूद ठेवण्यास मंजुरी दिल्याची माहिती जिल्हा परिषद बांधकाम व अर्थ सभापती मनीषा रत्नाकर पवार यांनी दिली.
विशेष म्हणजे ‘लोकमत’ने बुधवारी (दि. ७) नांदगाव ५६ खेडी पाणीपुरवठा योजनेबाबत ‘असून अडचण, नसून खोळंबा’ मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून या योजनेवर जिल्हा परिषदेचा दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च होत असून, योजनेच्या पुनर्नियोजनावर प्रकाश टाकला होता.
याबाबत पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर
यांना नांदगाव ५६ खेडी पाणीपुरवठा योजनेबाबत निवेदन देत योजना २००६ मध्येच कालबाह्य झाली असून, पाणीपुरवठ्याचा
गंभीर विषय असल्याने या योजनेसाठी शासन पातळीवरून तत्काळ मदत करण्याबाबत निवेदन दिले होते.
योजना सुरू झाली त्यावेळी योजनेची लोकसंख्या १ लाख ६० हजार इतकी धरण्यात आली होती. ती आता प्रत्यक्षात २ लाख ५० हजार ते ३ लाख इतकी झाली आहे. योजनेचा २००६ हा संकल्पित कालावधी संपुष्टात आला आहे. त्यामुळे योजनेतील जीर्ण पाइपलाइन बदलण्याबरोबरच आवश्यक त्या ठिकाणी पंपिंग स्टेशन व पाइपलाइन टाकण्यासाठी शासन पातळीवरून मदत करावी, असे निवेदनात म्हटले होते.