४२ घंटागाड्यांमध्येच आढळले विलगीकरण : खतप्रकल्पावर तपासणी
By Admin | Updated: May 23, 2017 21:57 IST2017-05-23T21:57:50+5:302017-05-23T21:57:50+5:30
घंटागाडी ठेकेदारांनी घरोघरी जाऊन घनकचरा संकलित करताना त्याचे ओला व सुका असे विलगीकरण अपेक्षित आहे.

४२ घंटागाड्यांमध्येच आढळले विलगीकरण : खतप्रकल्पावर तपासणी
नाशिक : घंटागाडी ठेकेदारांनी घरोघरी जाऊन घनकचरा संकलित करताना त्याचे ओला व सुका असे विलगीकरण अपेक्षित आहे. परंतु, ठेकेदारांकडून केवळ कंपार्टमेंट टाकून देखावा केला जात असल्याने आयुक्तांच्या आदेशानुसार मंगळवारी आरोग्य विभागाकडून खतप्रकल्पावर दिवसभरात आलेल्या घंटागाड्यांची तपासणी करण्यात आली. यावेळी, अवघ्या ४२ घंटागाड्यांमध्येच प्राथमिक स्तरावर कचरा विलगीकरणाची प्रक्रिया राबविली जात असल्याचे निदर्शनास आले. आता आरोग्य विभागाकडून त्याबाबतचा अहवाल आयुक्तांना सादर केला जाणार आहे.
शहरात घनकचरा संकलित करताना ओला व सुका कचरा विलगीकरणाची जबाबदारी घंटागाडी ठेकेदारांवर सोपविण्यात आली आहे. त्यासाठी घंटागाड्यांमध्ये ओला व सुका कचरा यांच्यासाठी वेगवेगळे कंपार्टमेंट करणेही बंधनकारक केले आहे. परंतु, घंटागाड्यांमध्ये कंपार्टमेंट करूनही ओला व सुका कचऱ्याचे विलगीकरण होत नसल्याबद्दल आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी सोमवारी (दि.२२) घंटागाडी ठेकेदारांच्या बैठकीत सुनावले होते. त्यानुसार, आयुक्तांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना थेट खतप्रकल्पावर दिवसभर थांबून घंटागाड्यांची तपासणी करण्याचे आणि त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेशित केले होते. त्याप्रमाणे, मंगळवारी (दि.२३) सहायक आरोग्य अधिकाऱ्यांनी दिवसभर खतप्रकल्पावर थांबून येणाऱ्या प्रत्येक घंटागाडीची तपासणी केली.