माजी महापौर वाघ, घोलपांसह ४२ नगरसेवकांचा पराभव
By Admin | Updated: February 24, 2017 01:33 IST2017-02-24T01:33:29+5:302017-02-24T01:33:49+5:30
नेतापुत्र नाकारले : सातपूरला प्रेम- अमोल पाटील, गाजलेल्या पवन पवार, लोंढेंनाही झटका

माजी महापौर वाघ, घोलपांसह ४२ नगरसेवकांचा पराभव
नाशिक : अनेक नाट्यमय घडामोडींनी गाजलेल्या महापालिकेच्या निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल लागले आहेत. मनसेचे प्रथम महापौरपद भूषवून पक्ष बदल करणाऱ्या अॅड. यतिन वाघ यांना तसेच शिवसेनेच्या माजी महापौर नयना घोलप यांना पराभवाचा धक्का देण्यात आला आहे. त्याचबरोबर अनेक नेत्यांच्या पुत्रांना नाकारत मतदारांनी निवडणूक रिंगणातील ४२ नगरसेवकांनाही घरी बसवले आहे. तर वादग्रस्त ठरलेल्या पवन पवार, तसेच सातपूरमधील प्रकाश लोंढे यांनाही झटका देण्यात आला आहे.
नाशिकमध्ये यंदाची निवडणूक अनेक घटनांनी गाजली. मनसेचे प्रथम महापौरपद भूषविणाऱ्या अॅड. यतिन वाघ यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढविली असली तरी त्यांना मतदारांनी पराभूत करीत राष्ट्रवादीचे नेते गजानन शेलार यांना निवडून दिले. या पंचवार्षिक पूर्वी महापौरपद असलेल्या शिवसेनेच्या महिला महापौर नयना घोलप यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. त्यांना भाजपाच्या सरोज अहिरे यांनी पराभूत केले, तर त्यांच्या भगिनी तनुजा घोलप यांना भाजपाच्याच कोमल मेहरोलिया यांनी पराभूत केले. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते माजी मंत्री बबन घोलप यांच्या या दोन्ही कन्या असून, आमदार योगेश घोलप यांच्या त्या भगिनी आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे गाजलेल्या नाशिकरोड येथील पवन पवार यांना भाजपाने उमेदवारी नाकारली असल्याने त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. तथापि, भाजपाच्या अधिकृत उमेदवाराने त्यांचा पराभव केला आहे. अशाच प्रकारे वादग्रस्त ठरलेले आणि भाजपाने युतीही न केलेले रिपाइंचे जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ नगरसेवक प्रकाश लोंढे यांना प्रभाग नऊमधून नाकारत मतदारांनी भाजपाच्या एका सामान्य कार्यकर्त्याला विजयी केले आहे.
या निवडणुकीत एकूण ४२ नगरसेवकांना पराभूत व्हावे लागले असून, त्यात महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या तथा राष्ट्रवादीच्या उमेदवार प्रा. कविता कर्डक तसेच मनसेचे गटनेते तसेच महापालिका निवडणुकीत पक्षाचे प्रवक्ता ठरलेले अनिल मटाले यांनादेखील पराभवाला सामोरे जावे लागले आहे. २००७ मधील मनपा निवडणुकीत जायंट किलर ठरलेले द्वारका परिसरातील शिवसेना नगरसेवक सचिन मराठे यांना नवख्या प्रथमेश गिते यांनी पराभूत केले आहे.