३९ कोटी रुपये घरपट्टी वसूल
By Admin | Updated: August 11, 2015 23:45 IST2015-08-11T23:43:49+5:302015-08-11T23:45:14+5:30
महापालिका : पाणीपट्टीतून साडेआठ कोटींचा महसूल

३९ कोटी रुपये घरपट्टी वसूल
नाशिक : राज्य शासनाने ५० कोटी रुपयांच्या आतील उलाढालीवरील एलबीटी रद्द करण्याची घोषणा केल्यानंतर महापालिकेने उत्पन्नाचा मोठा स्त्रोत असलेल्या घरपट्टी-पाणीपट्टीच्या वसुलीकडे लक्ष केंद्रित केले असून, एप्रिल ते जुलै या चार महिन्यांत घरपट्टीच्या माध्यमातून ३९ कोटी ६४ लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. दरम्यान, पाणीपट्टीतूनही ८ कोटी ४० लाखांचा महसूल पालिकेच्या खजिन्यात जमा झाला असून, येत्या आठ दिवसांत सर्व नळजोडणीधारकांना पाणीपट्टीची बिले वितरित करण्याचे आदेश उपआयुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी विभागीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. महापालिकेने घरपट्टी वसुलीसाठी थकबाकीदारांबरोबरच रडारवर नसलेल्या मिळकतींचाही शोध घेण्याची मोहीम आखली आहे. घरपट्टीच्या माध्यमातून महसुलात वाढ होण्यासाठी महापालिकेने चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीकरिता मिळकतधारकांसाठी सवलत योजना राबविली होती. या सवलत योजनेला मिळकतधारकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता.