वाळूची चोरटी वाहतुक करणारे ३७ डंपर पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 16:00 IST2017-11-24T16:00:13+5:302017-11-24T16:00:48+5:30
नाशिक, नंदुरबार जिल्ह्यातील वाळू सम्राट तापी नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसा करून चोरटी वाहतूक करत आहेत.या वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी सटाणा-ताहाराबाद रस्त्यावर सापळा रचून तब्बल ३७ वाळूचे डंपर पकडण्यात आले.

वाळूची चोरटी वाहतुक करणारे ३७ डंपर पकडले
सटाणा-ताहाराबाद रस्ता : सटाणा तहसील आणि पोलिसांची संयुक्त कारवाई
सटाणा : नाशिक, नंदुरबार जिल्ह्यातील वाळू सम्राट तापी नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसा करून चोरटी वाहतूक करत आहेत.या वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी सटाणा-ताहाराबाद रस्त्यावर सापळा रचून तब्बल ३७ वाळूचे डंपर पकडण्यात आले. सटाणा तहसील आणि जायखेडा पोलीस यांनी ही संयुक्त कारवाई केली. पकडलेल्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करून पस्तीस ते चाळीस लाख रुपये दंड वसूल होईल असे तहसीलदार सुनील सौंदाणे यांनी सांगितले. आतापर्यंत जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई असल्याचे सूत्रांनी सांगितले.
बनावट परवाने छापून तसेच क्षमतेपेक्षा अधिक वाळू भरून तापी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूची चोरी केली जात आहे. ही वाळू नाशिक ,मुंबईकडे चढ्या भावाने विक्र ी करण्याचे मोठे रॅकेट नंदुरबार , नाशिक जिल्ह्यात कार्यरत आहे. ही चोरटी वाहतुक गेल्या काही दिवसांपासून अधिक जोमाने सुरु असल्याने वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी प्रांत प्रवीण महाजन , तहसीलदार सुनील सौंदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार सुधाकर राठोड ,विनोद चव्हाण ,जायखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या विशेष पथकाने सटाणा-ताहाराबाद रस्त्यावरील करंजाड जवळ सापळा रचण्यात आला.यावेळी वाळूने भरलेले तब्बल ३७ डंपरचा ताफा हॉटेल शाहूच्या मैदानावर थांबल्यावर पथकाने छापा टाकला.
यावेळी डंपर क्र मांक (एमएच १५ डीके ७२००) यावरील चालक डंपर पळवून नेऊन पसार झाला.महसूल विभागाने त्या डंपर चालक व मालका विरु द्ध वाळू चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.या पथकाने उर्वरित वाळूचे डंपर सटाणा तहसील आवारात जमा करून अधिकृत परवान्याची तपासणी केली.