पुरातत्त्व विभागाची ३६ लाखांची फसवणूक
By Admin | Updated: September 2, 2015 23:22 IST2015-09-02T23:22:26+5:302015-09-02T23:22:59+5:30
पुरातत्त्व विभागाची ३६ लाखांची फसवणूक

पुरातत्त्व विभागाची ३६ लाखांची फसवणूक
नाशिक : पुरातत्त्व विभागाच्या बँकेतील खाते नंबरचा बनावट धनादेश तयार करून त्याद्वारे सुमारे ३६ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला असून या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
नाशिक प्रादेशिक पुरातत्त्व विभागाचे सहसंचालक डॉ़ श्रीकांत श्रीधर घारपुरे (रा़ सावरकरनगर) यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार पुरातत्त्व विभागाचे ११२९१९ ३०३४९ नंबरचे बँकेत खाते आहे़ बँक आॅफ इंडियामधील संशयित राजेश स्टील नामक खातेदाराने पुरातत्त्व खात्याच्या नंबरचा ३५ लाख ६४ हजार ३० रुपयांचा बनावट धनादेश तयार करून तो २९ जुलैला बँक आॅफ इंडियाच्या खात्यात जमा केला़
बँक आॅफ इंडियाने हा धनादेश वटविण्यासाठी स्टेट बँकेत पाठविल्यानंतर हा धनादेश वटल्यानंतर संबंधित राजेश स्टीलच्या खातेदाराने ही रक्कम काढून घेतली़ पुरातत्त्व विभागाच्या खातेनंबरवरून बनावट धनादेश तयार करून तो वटवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे़ (प्रतिनिधी)