नाशकात चिकनगुनियाचे तब्बल ३६ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:19 IST2021-06-16T04:19:40+5:302021-06-16T04:19:40+5:30
नाशिक : शहरात पावसाळ्याच्या सुरुवातीला साधारणत: डेंग्यूची साथ असते. मात्र, यंदा चिकनगुनियाने डोकेदुखी वाढविली आहे. सातपूरच्या श्रमिकनगर भागात ३२ ...

नाशकात चिकनगुनियाचे तब्बल ३६ रुग्ण
नाशिक : शहरात पावसाळ्याच्या सुरुवातीला साधारणत: डेंग्यूची साथ असते. मात्र, यंदा चिकनगुनियाने डोकेदुखी वाढविली आहे. सातपूरच्या श्रमिकनगर भागात ३२ तर अंबड येथील दत्तनगरात ५ असे ३६ रुग्ण आढळले आहेत. गेल्या वर्षी या कालावधीत एकही या आजाराचा रुग्ण नव्हता. दरम्यान, याच वेळी रक्ताचे नमुने तपासणीत चिकनगुनियाच्याच अनेक रुग्णांना डेंग्यू झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे आत्तापर्यंत एकूण ६५ डेंग्यू रुग्ण आढळले आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच यंत्रणा कामाला लागली आहे.
नाशिकमध्ये दरवर्षी डेंग्यू रुग्णांची डोकेदुखी असते. गेल्या वर्षाचा अपवाद सोडला, तर दरवर्षी हजारे एक डेंग्यू रुग्ण आढळतात. मात्र, यंदा डेंग्यूच्या तुलनेत आधीच चिकनगुनियाने मुसंडी मारली आहे. सातपूरच्या श्रमिकनगर भागात चिकनगुनियाचे आधी पाच मग दहा रुग्ण आढळले. त्यामुळे महापालिकेचे जीवशास्त्रज्ञ डॉ.राजेंद्र त्र्यंबके यांनी प्रत्यक्ष या ठिकाणी भेटी दिल्या आणि नंतर त्या ठिकाणी घरभेटींची मोहीम राबविली. याच दरम्यान, आता अंबड येथील दत्तनगर भागातही चिकनगुनियाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे महापालिकेने येथेे रक्तनमुने तपासणी केल्यानंतर, श्रमिकनगर येथे ३१ तर दत्तनगरमध्ये पाच असे एकूण ३६ रुग्ण आढळले आहेत. त्याचबरोबर त्यातील अनेकांना डेंग्यूही झाल्याचे आढळले आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत ६५ रुग्ण आढळले आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीत ७३ डेंग्यू रुग्ण आढळले होते. त्या तुलनेत यंदा डेंग्यू रुग्णांची संख्या अल्पशा कमी आहे. मात्र, डेंग्यू रुग्ण लवकर शोधून काढण्यासाठी गतवर्षीच्या तुलनेत अधिक रक्तनमुने तपासल्याची माहिती डॉ.त्र्यंबके यांनी दिली.
इन्फेा...
नागरिकांना नोटिसा
महापालिकेने चिकनगुनिया आढळलेल्या ठिकाणी घरभेटी आणि तपासणीबरोबरच स्वच्छता मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर, टायर्स जप्त करण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी डासांची उत्पन्न स्थाने असतील, तेथील नागरिकांना नोटिसाही बजावल्या आहेत. यानंतर, पुन्हा डास उत्पत्तीसाठी पोषक वातावरण केल्यास दंड करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
कोट...
चिकनगुनियाचे सर्वात प्रमुख लक्षणे ताप आहे. या तापाची लक्षणे अन्य तापापेक्षा वेगळी असतात, तसेच मळमळ, पुरळ, डोकेदुखी, तसेच थकवा असाही त्रास होतो. डासांची उत्पत्ती होऊ न देणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. त्यामुळे पाणी साचून डासांची उत्पत्ती स्थाने तयार होणार नाहीत, याची काळजी घ्यावी.
- डॉ.राजेंद्र त्र्यंबके, जीवशास्त्रज्ञ, महापालिका