बीजेएसच्या चाचण्यांतून आठवडाभरात ३१ बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:16 IST2021-05-20T04:16:26+5:302021-05-20T04:16:26+5:30
नाशिक : लसीकरणापूर्वी अँटिजन किंवा आरटीपीसीआर चाचणी होऊन त्यातून पॉझिटिव्ह रुग्णांना हुडकून त्यांना आवश्यक सल्ला व उपचार उपलब्ध करून ...

बीजेएसच्या चाचण्यांतून आठवडाभरात ३१ बाधित
नाशिक : लसीकरणापूर्वी अँटिजन किंवा आरटीपीसीआर चाचणी होऊन त्यातून पॉझिटिव्ह रुग्णांना हुडकून त्यांना आवश्यक सल्ला व उपचार उपलब्ध करून देणे व निगेटिव्ह व्यक्तींचेच लसीकरण व्हावे, या संकल्पनेद्वारे मिशन झिरो व मिशन लसीकरण हे अभियान बीजेएस आणि नाशिक मनपाच्यावतीने राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत नाशिक शहरात गत आठवडाभरात करण्यात आलेल्या २९२७ ॲन्टिजन चाचण्यांमधून ३१ बाधित रुग्ण आढळून आले आहेत.
नाशिक महानगरपालिका, भारतीय जैन संघटना, वॉटर ग्रेस कंपनी व नाशिक वॉरियर्स या संस्थांद्वारे पंचवटी व नाशिक रोड विभागात या चाचण्या करण्यात आल्या आहेत. लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर स्क्रिनिंग होणार असून त्यातून पॉझिटिव्ह रुग्णांना वेळेवर उपचार उपलब्ध होऊन गर्दीत होणारे संक्रमण थांबेल. तसेच उर्वरित नागरिकांच्या लसीकरण मोहिमेला बळकटी मिळणार आहे.
इंदिरा गांधी रुग्णालय, मायको दवाखाना फुलेनगर, प्राथमिक आरोग्य केंद्र म्ह्सरूळ, मखमलाबाद, तपोवन व खोले मळा नाशिकरोड येथे हे अभियान सुरू झाले.
सहाव्या दिवशी एकूण १३८ अँटिजन चाचण्या होऊन १ पॉझिटिव्ह रुग्ण शोधण्यात आला, तर १३७ निगेटिव्ह रुग्णांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले. याप्रमाणे मिशन सुरू झाल्यापासून ३१ बाधित रुग्णांना शोधण्यात यश आले, तर २८९६ निगेटिव्ह रुग्णांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले.