इगतपुरीत अडकलेले ३०२ परप्रांतीय मजूर विशेष रेल्वेतून परराज्यांत रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 17:11 IST2020-05-05T17:09:55+5:302020-05-05T17:11:03+5:30
सर्व ३०२ व्यक्तींना तपासणी करून संसर्ग नसल्याचा दाखला घेतल्यानंतर रवाना करण्यात आल्याची माहिती तहसिलदार अर्चना पागीरे यांनी दिली.

इगतपुरीत अडकलेले ३०२ परप्रांतीय मजूर विशेष रेल्वेतून परराज्यांत रवाना
नाशिक : मुंबई येथून निघालेल्या उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, बंगाल येथील ३०२ परप्रांतीय मजूरांना २१ एप्रिलरोजी इगतपुरीजवळील घाटनदेवी परिसरात पोलिसांनी रोखले होते. सदर मजूर पलायन करत असल्याने इगतपुरी पोलिसांनी रोखले होते. इगतपुरी येथिल शासकिय रूग्णालयात तपासणी करण्यासाठी त्यांना पाठविले. त्यानंतर या परप्रांतीय मजूरांना इगतपुरी तालुक्यातील पिंपरी सदो जवळील एकलव्य मॉडेल रेसिडेन्सी शाळेच्या हॉलमधील क्वॉरण्टाइन कक्षामध्ये ठेवण्यात आले होते. या मजूरांना त्यांच्या मूळ गावी जाण्याचे आदेश शासनाकडून मिळाल्यानंतर इगतपुरीत अडकलेल्या उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, बंगाल आदीं ठिकाणच्या नागरिकांना घेऊन जाण्यासाठी स्पेशल रेल्वेची व्यवस्था करून या सर्व ३०२ व्यक्तींना तपासणी करून संसर्ग नसल्याचा दाखला घेतल्यानंतर रवाना करण्यात आल्याची माहिती तहसिलदार अर्चना पागीरे यांनी दिली.
या सर्व ३०२ मजूरांची व्यवस्था जवळच असलेल्या गुरूद्वारा समितीने केली. त्यांना एक वेळ नाश्ता चहा, दोन वेळचे जेवण अशी व्यवस्था केली होती. लोकसहभागातून इगतपुरी इगतपुरी येथिल जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण फलटणकर यांच्या नेतृत्वाखाली प्रतिष्ठाणच्या वतीने स्थलांतरित मजूरांना अत्यावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच मुंढेगाव येथील जिंदाल पॉलीफिल्म कंपनीकडून दैनंदिन वापरात येणार्या टुथपेस्ट, तेल, साबन, ब्रश चे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे इगतपुरी तालुक्यातील धामणगाव येथील ग्रामस्थांच्या वतीने एक पिक अप भरून विविध प्रकारचा भाजीपाला पागीरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गोरख बोडके यांनी देखील तालुक्यातील गरीब गरजूवंत, तसेच शिधापञकिा नसलेल्या नागरिकांना मोफत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करत मोलाची मदत केली. तालुक्यातील आरोग्य केंद्रातील अधिकारी तसेच अंगणवाडी सेविका, आरोग्यसेविका, आशासेविका यांनी देखील आपापल्या गावातील घरोघरी जाऊन सॅनिटायझरचे वाटप केले.