सुरगाण्यासाठी ३० टक्के पाणी राखीव ठेवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:11 IST2021-07-24T04:11:17+5:302021-07-24T04:11:17+5:30

प्रस्तावित नार-पार वळण योजना आणि मृद्‌ व जलसंधारण विभागाच्या विविध सिंचन प्रश्नांसंदर्भात राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या ...

30% water will be reserved for Surgana | सुरगाण्यासाठी ३० टक्के पाणी राखीव ठेवणार

सुरगाण्यासाठी ३० टक्के पाणी राखीव ठेवणार

प्रस्तावित नार-पार वळण योजना आणि मृद्‌ व जलसंधारण विभागाच्या विविध सिंचन प्रश्नांसंदर्भात राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार नितीन पवार यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत वळण योजनेसाठी जमीन भूसंपादन करताना शासकीय दर कमी असल्यामुळे समृद्धी महामार्गाप्रमाणे हेक्टरी दर निश्चित करावा, अशी मागणी पवार यांनी केली. याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन यावेळी पाटील यांनी दिले.

नार-पार नदीजोड वळण योजना तसेच सन २०१२ पासून प्रलंबित असलेल्या मृद्‌ व जलसंधारण विभागाकडील सिंचन योजना, सुरगाणा तालुक्यातील श्रीभुवन प्रकल्पासह दुमीपाडा धरणाचा प्रश्न यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली.

नार-पार औरंगा-अंबिका या पश्चिमवाहिनी खोऱ्यात ३१.११ टी.एम.सी. पाणी उपलब्ध असून त्यापैकी १०.७५ टी.एम.सी. पाणी वळविण्यासाठी प्रस्तावित आहे. सुरगाणा तालुक्यासाठी केवळ १५ टक्के पाणी राखीव ठेवण्याचे नियोजित असल्याने त्यात बदल करून किमान ३० टक्के पाणी स्थानिकांना राखीव ठेवण्याचे आदेश पाटील यांनी दिले.

सुरगाणा तालुक्यात जमीन खरेदी-विक्रीचे प्रमाण कमी असल्याने वळण योजना राबविताना भूसंपादन करण्यात येणाऱ्या जमिनीस प्रतिहेक्टरी शासकीय देय दर अत्यंत कमी आहे. त्यात वाढ करून जमीनधारकांना विशेष बाब म्हणून समृद्धी महामार्गाप्रमाणे हेक्टरी दर निश्चित करावा, अशी मागणी पवार यांनी केल्यावर, सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन यावेळी पाटील यांनी दिले.

वळण योजना राबविण्यापूर्वी सन २०१२ पासून प्रलंबित असलेल्या साठवण तलाव सोनगीर, बाळओझर, ल.पा. योजना वाघधोंड, मालगोंदा, सालभोये व उंबरविहीर योजना पूर्ण करण्यासाठी या योजनांचे काटछेद संकल्पन तात्काळ देण्याचे निर्देशही पाटील यांनी जलसंपदा विभागाचे सचिव व नाशिक मेरीचे महासंचालक यांना दिले. तसेच २५१ ते ६०० हेक्टर सिंचन क्षमतेच्या २२ योजनांवर तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

नार-पार योजनेेपूर्वी सुरगाणा तालुक्यातील लघु बंधारे, पाझर तलाव, साठवण तलाव, सिमेंट गेटेड बंधारे बांधण्याबाबत प्रथमप्राधान्याने प्रयत्न करण्याचे निर्देश पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले.

बैठकीस जलसंपदा विभागाचे सचिव, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे, तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगाव या महामंडळांचे कार्यकारी संचालक, महासंचालक, मेरी नाशिक, सहसचिव तथा मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, मंत्रालय मुंबई, तसेच जलसंपदा व जलसंधारण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कोट...

सुरगाणा तालुक्यात सिंचन योजना नसल्याने फक्त १ टक्का सिंचन होते. त्यामुळे येथील आदिवासी बांधव रोजगारासाठी स्थलांतर करतो. कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी नार-पार योजनेपूर्वी सुरगाणा तालुक्यातील लघु बंधारे, पाझर तलाव, साठवण तलाव, सिमेंट गेटेड बंधारे बांधण्याबाबत सरकारने प्रथमप्राधान्य द्यावे यासाठी मी आग्रही आहे.

- नितीन पवार, आमदार, कळवण - सुरगाणा

फोटो - २३ कळवण १

सुरगाणा तालुक्यातील सिंचन योजनांसंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना जलसंपदामंत्री जयंत पाटील. समवेत आमदार नितीन पवार व जलसंपदा विभागाचे अधिकारी.

Web Title: 30% water will be reserved for Surgana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.