पोलीस प्रबोधिनीत २४ तास ‘तिरंगा’
By Admin | Updated: August 17, 2015 00:25 IST2015-08-17T00:22:47+5:302015-08-17T00:25:40+5:30
देशप्रेमाचे स्फुलिंग : २० बाय ३० फुटांचा राष्ट्रध्वज

पोलीस प्रबोधिनीत २४ तास ‘तिरंगा’
नाशिक : पोलीस अधिकारी घडविणाऱ्या महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीची (एमपीए) ओळख आता आणखी एका गोष्टीसाठी होणार आहे़ ती म्हणजे प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये देशप्रेमाची ज्योत पेटविणारा सर्वांत मोठा आणि उंच राष्ट्रध्वज (तिरंगा) या ठिकाणी १५ आॅगस्टपासून अभिमानाने फडकतो आहे़ प्रबोधिनीच्या तीन नंबरच्या गेटजवळ तयार करण्यात आलेल्या स्तंभावर चोवीस तास हा तिरंगा फडकताना दिसणार आहे़ नवी मुंबईनंतर नाशिकमध्ये इतका मोठा राष्ट्रध्वज असल्याचे सांगितले जाते आहे़
भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून त्र्यंबकरोडवरील महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीतील अधिकारी नवल बजाज व हरिष बैजल यांच्या संकल्पनेतून याची निर्मिती करण्यात आली असून, त्यास मुंबईतील जिंदाल फाउंडेशनचे सहकार्य लाभले आहे़ २० फूट बाय ३० फूट आकार असलेला हा तिरंगा तब्बल साडेआठ किलो वजनाचा आहे़ यासाठी १०० फूट उंचीचा ध्वजस्तंभ तयार करण्यात आला आहे़ रात्रीच्या वेळी ध्वजावर प्रकाश रहावा यासाठी चार हॅलोजन लावण्यात आले असून, विद्युत पुरवठा खंडित झाला तरी बॅकअपवर हॅलोजन सुरू राहणार आहेत़
राष्ट्रध्वजासाठी स्वतंत्र मैदान तयार करण्यात आले असून, त्र्यंबकेश्वर रस्त्याने जाणाऱ्या प्रत्येकाला तो दिसावा यासाठी जाळी लावण्यात येणार आहे़ राष्ट्रध्वज संहितेतील नियमांचे पालन करून हा तयार करण्यात आला आहे़ सहा महिन्यांनंतर वास्तुविशारद धनंजय शिंदे यांच्या संकल्पनेतून भव्य प्रवेशद्वाराची निर्मिती केली जाणार आहे़ नॉर्थ इंडिया, नवी मुंबई, बंगळुरू, जयपूर, दिल्ली (कॅनॉट प्लेस) या ठिकाणी सर्वांत उंच राष्ट्रध्वज आहेत़ पोलीस प्रबोधिनीत झालेल्या स्वातंत्र्यदिन कार्यक्रमाप्रसंगी अधिकारी, कर्मचारी, प्रशिक्षणार्थी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते़ (प्रतिनिधी)