जिल्ह्यात २३ टक्के लस वाया !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:15 IST2021-04-02T04:15:21+5:302021-04-02T04:15:21+5:30
नाशिक : जिल्ह्याला प्राप्त झालेल्या लसपैकी तब्बल २३.४ टक्के इतकी लस वाया गेल्याचे राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या अहवालातून निदर्शनास ...

जिल्ह्यात २३ टक्के लस वाया !
नाशिक : जिल्ह्याला प्राप्त झालेल्या लसपैकी तब्बल २३.४ टक्के इतकी लस वाया गेल्याचे राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या अहवालातून निदर्शनास आले आहे. १६ जानेवारीला लसीकरणाला प्रारंभ झाल्यापासून आतापर्यंत एकूण ८२ हजार ९२३ इतक्या लस वाया गेल्या आहेत.
नाशिक जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यास कोरोना लस मिळण्याचे प्रमाणदेखील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत समाधानकारक होते. मुंबई, पुणे, ठाणे, नागपूरखालोखाल सर्वाधिक म्हणजे पाचव्या क्रमांकाचा लसपुरवठा नाशिक जिल्ह्याला करण्यात आला होता. त्यानुसार मार्च अखेरपर्यंत नाशिक जिल्ह्याला एकूण तीन लाख ५४ हजार ८१० इतका लस पुरवठा करण्यात आला होता. मात्र, त्यातील केवळ दोन लाख ७१ हजार ८८७ लसचाच वापर जिल्ह्यातील नागरिकांच्या लसीकरणासाठी करण्यात आला आहे. त्यामुळे जवळपास एक चतुर्थांश किंवा टक्केवारीत तब्बल २३.४ टक्के इतकी लस वाया गेल्याचे दिसून येत आहे. नाशिक जिल्ह्याला करण्यात आलेल्या पुरवठ्यापैकी एकूण ८२ हजार ९२३ लस वाया गेल्याचे आरोग्य विभागाच्याच अहवालातून निष्पन्न झाले आहे.
इन्फो
वाया जाण्याबाबत संशय
नाशिक शहरात आणि जिल्ह्याच्या काही केंद्रांवर गुरुवारी सकाळी लस संपल्याने नागरिकांना माघारी परतावे लागण्याची वेळ येण्याचा प्रकार एकीकडे घडत आहे. त्याच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात लस वाया जात असल्याने नक्की लस वाया जाते की कुठेही नोंद न होता परस्पर कुणाला दिली जाते, याबाबत दबक्या आवाजात संशय व्यक्त केला जात आहे.