नऊ वर्षांत स्वाइन फ्लूचे २१७ बळी

By Admin | Updated: March 29, 2017 23:29 IST2017-03-29T23:29:04+5:302017-03-29T23:29:22+5:30

नाशिक: नाशिक शहर व जिल्ह्यात स्वाइन फ्लू संशयितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे़ गत नऊ वर्षांत स्वाइन फ्लूने जिल्ह्यातील २१७ नागरिकांचा बळी घेतला

217 victims of swine flu in nine years | नऊ वर्षांत स्वाइन फ्लूचे २१७ बळी

नऊ वर्षांत स्वाइन फ्लूचे २१७ बळी

विजय मोरे : नाशिक
मुंबई : पुणेपाठोपाठ नाशिक शहर व जिल्ह्यात स्वाइन फ्लू संशयितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे़ गत नऊ वर्षांत स्वाइन फ्लूने जिल्ह्यातील २१७ नागरिकांचा बळी घेतला असून, २०१६ मध्ये चार नागरिकांचा मृत्यू झाला आहे़ दरम्यान, जिल्हा रुग्णालय, जिल्हा परिषद आरोग्य विभाग तसेच महापालिका क्षेत्रातील सरकारी दवाखान्यांमध्ये १ जानेवारी ते २५ मार्च २०१७ या कालावधीत ३८ हजार १७० रुग्णांची तपासणी (स्क्रिनिंग) करण्यात आली असून, १४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे़  नाशिक जिल्ह्यातील वातावरण बदलामुळे स्वाइन फ्लू या संसर्गजन्य आजाराच्या रुग्णसंख्येत वर्षागणिक वाढ होताना दिसून येते़ २००९, २०१०, २०१२ ते २०१५ या वर्षांमध्ये स्वाइन फ्लूचा जिल्ह्यात सर्वाधिक प्रकोप झाला़ तर २०११ व २०१६ या वर्षी स्वाइन फ्लूचे प्रमाण कमी झाले होते़ २०१५ या वर्षात जिल्हाभरात तीन लाखांहून अधिक संशयित नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली़ त्यामध्ये २३९ नागरिकांचा स्वाइन फ्लू अहवाल पॉझिटीव्ह आल्याने त्यांना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले होते़ त्यापैकी ८७ नागरिकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़  २०१६ मध्ये स्वाइन फ्लूने जिल्ह्यात डोके वर काढले नाही़ या वर्षात १६ नागरिकांना उपचारासाठी रुग्णालयात दखल करण्यात आले होते़ त्यापैकी ४ रुग्णांचा मृत्यू झाला़ तर आरोग्य यंत्रणेने केलेली जनजागृती व प्रभावी उपचार पद्धती यामुळे नागरिकांचे प्राण वाचले तसेच रोगाचा फैलावही झाला नाही़ या वर्षभरात जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्ष काही दिवसांपुरताच उघडण्यात आला होता़  नाशिक जिल्ह्यात स्वाइन फ्लूने आता पुन्हा डोके वर काढले असून, शहरासह ग्रामीण भागातही त्याचा झपाट्याने फैलाव होत आहे़ १ जानेवारी ते २५ मार्च २०१७ या कालावधीत जिल्हा रुग्णालय, जिल्हा परिषद तसेच महापालिका क्षेत्रातील रुग्णालयांमध्ये तब्बल ३८ हजार १७० नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे़  त्यामध्ये ७२ संशयितांना उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले होते़ त्यापैकी ६० नागरिकांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने त्यांच्यावर उपचार सुरू असून १८ रुग्णांना उपचारानंतर घरी पाठवून देण्यात आले, तर १४ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे़ दरम्यान, तपासणी केलेल्या नागरिकांपैकी संदिग्ध अशा २४९ रुग्णांना टॅमी फ्लूच्या गोळ्या देण्यात आल्या आहेत़
जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र कक्ष
नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात स्वाइन फ्लू संशयित रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे़ या ठिकाणी औषधोपचारासह सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे़ दरम्यान, या ठिकाणी काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्वाइन फ्लू प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले आहे़
जिल्ह्यातील स्वाइन फ्लू मृतांची संख्या
वर्ष दाखल रुग्ण मृत्यू
२००९ १२२ २२
२०१० २५४ ३९
२०११ ०१६ ०१
२०१२ ०३७ २१
२०१३ ०३४ १९
२०१४ ०२२ १०
२०१५ ५०८ ८७
२०१६ ०१६ ०४
२०१७ ०३३ १४ (२५ मार्चपर्यंत २०१७ पर्यंत)

Web Title: 217 victims of swine flu in nine years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.