२० रोजी जिल्हा बँक संचालकांचा फैसला

By Admin | Updated: April 19, 2016 00:16 IST2016-04-18T23:37:48+5:302016-04-19T00:16:02+5:30

विधान परिषदेत कायदा मंजुरी रखडली

On 20th, District Bank directors decided | २० रोजी जिल्हा बँक संचालकांचा फैसला

२० रोजी जिल्हा बँक संचालकांचा फैसला

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या संचालकांना अपात्र ठरविण्याच्या याचिकेवर शनिवारी (दि.१६) मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांसमोर सुनावणी झाली. आता याबाबत अंतिम सुनावणी २० एप्रिलला होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शनिवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणीसाठी जिल्हा बॅँक अध्यक्ष नरेंद्र दराडे, संचालक शिरीषकुमार कोतवाल, गणपतराव पाटील, परवेज कोकणी आदि उपस्थित होते. जिल्हा बॅँकेच्या वतीने अ‍ॅड. ढाकीफाळकर व अ‍ॅड. ओतुरकर यांनी युक्तिवाद मांडताना संचालकांना निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्याचा कायदा विधानसभेत मंजूर झालेला असला तरी प्रत्यक्षात तो विधान परिषदेत संमत झालेला नाही. त्यामुळे ही बाब न्यायालयाने लक्ष घालावे. त्यावर न्यायालयाने यावर अंतिम सुनावणी २० एप्रिल रोजी घेण्याचे आदेश दिल्याची माहिती जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी दिली.
राज्य सरकारच्या नवीन कायद्यानुसार प्रशासकीय मंडळ लागू झालेल्या नागरी व जिल्हा बॅँकांतील संचालकांना दहा वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी घालण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेची सुनावणी मुख्य न्यायाधीशांसमोर घेण्याची विनंती राज्य सरकारने केल्याने मुख्य न्यायाधीशांसमोर या याचिकेची सुनावणी घेण्यात येत आहे.
आता या प्रकरणी बुधवारी (दि.२०) अंतिम सुनावणी होणार असल्याने जिल्हा बॅँकेच्या त्या अकरा संचालकांचे अंतिम सुनावणीकडे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: On 20th, District Bank directors decided