वीस लाखांत बसवा प्रभागातील कामे
By Admin | Updated: January 16, 2015 23:57 IST2015-01-16T23:57:40+5:302015-01-16T23:57:51+5:30
नगरसेवकांना सूचना : आवश्यक कामांना देणार प्राधान्य

वीस लाखांत बसवा प्रभागातील कामे
नाशिक : महापालिकेच्या नाजूक आर्थिक परिस्थितीमुळे आयुक्तांनी प्रभागातील आवश्यक कामांनाच प्राधान्य देण्याचा पवित्रा घेतला असतानाच आता नगरसेवक निधीची मर्यादा केवळ २० लाख रुपयेच निश्चित करत त्यातच प्रभागातील अत्यावश्यक कामे सुचविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. काहीच कामे होत नसल्याची आणि दोन लाखांच्या कामांच्या फाईलीही निघत नसल्याची नगरसेवकांमध्ये होत असलेली ओरड थांबविण्यासाठीच आयुक्तांनी हा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे.
चालू आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात स्थायी समितीने ९० लाख रुपये नगरसेवक निधी निश्चित केला होता. त्यात दहा लाखाने वाढ करत महासभेने नगरसेवक निधी एक कोटी रुपये केला होता. त्यामुळे नगरसेवकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. प्रभागात कामांसाठी कोटी रुपये निधी मिळणार असल्याने नगरसेवकांनी अनेक कामे सुचविली होती. परंतु महापालिकेची आर्थिक स्थिती, वाढता स्पील ओव्हर लक्षात घेता संजय खंदारे यांनी आयुक्तपदाच्या कारकीर्दीत नगरसेवक निधी ३० लाखांवर आणला होता. तरीही नगरसेवकांची ओरड कायम होती.
दरम्यान, डॉ. प्रवीण गेडाम यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर महापालिकेच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेऊन अनावश्यक कामांना फाटा देण्याचा निर्णय घेतला. अनेक फाईली त्यांनी माघारी पाठवत कामांचे प्राधान्यक्रम निश्चित करण्याचे आदेश त्या-त्या विभागाला दिले. त्यानुसार विभागप्रमुखांनी कामांच्या याद्या आयुक्तांकडे सादर केल्या. प्रभागात कामे होत नसल्याच्या तक्रारी वाढत जाऊन नगरसेवकांमध्ये असंतोष पसरला.
स्थायी समिती, महासभेतही त्याचे पडसाद उमटले. स्थायी समितीने तर मागील सभेत सदस्यांची दोन लाखांची किरकोळ कामे होत नाही, आणि कोट्यवधींचे भूसंपादनाचे प्रस्ताव प्रशासन मंजुरीसाठी ठेवत असल्याबद्दल संताप व्यक्त केला होता. त्यातूनच सिंहस्थाचे भूसंपादनाचे प्रस्तावही स्थायी समितीने फेटाळून लावले होते. नगरसेवकांची ओरड लक्षात घेता आयुक्तांनी आता सुधारित अंदाजपत्रक तयार करताना नगरसेवक निधी २० लाखांवर आणला असून, त्यातच प्रभागातील आवश्यक ती कामे सुचविण्याचे आवाहन नगरसेवकांना केले असल्याचे समजते. अंदाजपत्रकानुसार बांधकाम, पाणीपुरवठा विभागातील तरतूद कधीच संपली असून, ज्या विभागातील कामांवर खर्चच झालेला नाही तो निधी या विभागातील कामांकडे वळविण्याचा विचार सुरू आहे.
नगरसेवकांनी दिलेल्या फाईलींमधून अत्यावश्यक कामांची निवड केल्यास प्राधान्यक्रमानुसार कामे मार्गी लावण्यावर भर दिला जाणार आहे. मात्र, कार्यादेश झालेल्या की निविदा प्रक्रियेत असलेल्या फाईलींना प्राधान्य दिले जाणार, याबाबत स्पष्टता नसल्याने नगरसेवकांमध्ये संभ्रम कायम आहे. (प्रतिनिधी)