ग्रामीण भागात वीस तास भारनियमन
By Admin | Updated: May 6, 2017 02:12 IST2017-05-06T02:12:14+5:302017-05-06T02:12:24+5:30
नाशिक : वीज कंपनीने ग्रामीण भागात व विशेषत: शेती क्षेत्रात अचानक शटडाउन करण्याचा निर्णय घेऊन जिल्ह्यात वीस तासांचे अघोषित भारनियमन सुरू झाले आहे.

ग्रामीण भागात वीस तास भारनियमन
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : वाढत्या उन्हाच्या तडाख्याने गेल्या दहा वर्षांत पहिल्यांदाच विजेच्या अचानक वाढलेल्या मागणीची पूर्तता करण्यात अपयश आलेल्या वीज कंपनीने ग्रामीण भागात व विशेषत: शेती क्षेत्रात अचानक शटडाउन करण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणीही सुरू केल्याने जिल्ह्यात वीस तासांचे अघोषित भारनियमन सुरू झाले आहे.
उन्हाळ्यात वीज गायब झाल्यामुळे ग्रामीण भागातील जनजीवनावर परिणाम होऊ लागला आहे. वीज कंपनीने गेल्या आठ ते दहा दिवसांपासून छुप्या पद्धतीने सुरू केलेल्या या भारनियमनाची झळ पोहोचू लागल्यानंतर शेतकऱ्यांनी एकत्र येत आवाज उठविण्यास सुरुवात केली आहे. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून नाशिकच नव्हे तर राज्यातच उष्णतेची लाट आली असून, मध्यंतरीचे काही दिवस वगळता अद्यापही ही लाट कायम आहे, परिणामी शहरी व ग्रामीण या दोन्ही भागात विजेचा वापर तसेच मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. वीज कंपनीने भारनियमनमुक्ती केलेली असली तरी, त्यांच्या म्हणण्यानुसार गेल्या दहा वर्षांत पहिल्यांदाच विजेची मागणी व पुरवठा यात मोठी तफावत निर्माण झाली आहे. दर दिवसा मिळणारी वीज व तिचा वाढणारा वापर लक्षात घेता, त्याची पूर्तता करणे अवघड झाले असून, त्यासाठी विजेची बचत करणे हाच एकमेव पर्याय असला तरी, सध्या वाढत्या उष्णतेचा विचार करता वीज बचतीचा पर्याय स्वीकारार्ह होणे अशक्य आहे. त्यामुळे वीज वापरात कपात करण्याशिवाय पर्याय उरलेला नसलेल्या वीज कंपनीने आर्थिकदृष्ट्या परवडत नसलेल्या कृषी क्षेत्राच्या विजेवर डल्ला मारला आहे. वीज वापर व त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नात कृषी क्षेत्राचा क्रमांक घसरता असल्यामुळे एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत दहा ते बारा तास चालणाऱ्या ग्रामीण भागातील भारनियमात वाढ करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून चोवीस तासांपैकी फक्त वीस तासच वीज पुरवठा केला जात असून, त्याचा ग्रामीण व्यवस्थेवर परिणाम होत आहे. उन्हाळी कांद्यासाठी पिकांना पाणी देणे खंडित वीज पुरवठ्यामुळे शक्य होत नाही, उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे कांदा पाण्याअभावी करपू लागला आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांसाठी पाणी भरणेदेखील मुश्कील झाले आहे.