क्षमतेपेक्षा अधिक वाळूवाहतूक करणारे १९ ट्रक जप्त

By Admin | Updated: September 13, 2016 00:51 IST2016-09-13T00:50:54+5:302016-09-13T00:51:05+5:30

धाबे दणाणले : महसूल, उपप्रादेशिक परिवहन विभागाची धडक कारवाई

19 trucks seized more than capacity | क्षमतेपेक्षा अधिक वाळूवाहतूक करणारे १९ ट्रक जप्त

क्षमतेपेक्षा अधिक वाळूवाहतूक करणारे १९ ट्रक जप्त

मालेगाव : मुंबई-आग्रा महामार्गावरून क्षमतेपेक्षा अधिक वाळू वाहून नेणाऱ्या १९ ट्रक येथील महसूल प्रशासनाने तब्बल पाच तास कारवाई करीत जप्त केले आहेत. महसूल विभागाने ट्रकमालकांना पाच लाख १३ हजार रुपये, तर उपप्रादेशिक परिवहन विभागाने नऊ लाख ५० हजार रुपये असा एकूण १४ लाख ६३ हजार रुपये दंड केला आहे.
महसूल विभागाने वाळूमाफीयांवर धडक कारवाई केल्याने त्यांचे धाबे दणाणले आहे. सारंगखेडा, शहादा, नंदुरबार, धुळे येथून नाशिक व मुंबईकडे क्षमतेपेक्षा अधिक वाळू भरून ट्रक जात असल्याची माहिती प्रांत अधिकारी अजय मोरे, तहसीलदार डॉ. सुरेश कोळी यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी आज पहाटे ४० तलाठ्यांच्या पथकासह मुंबई-आग्रा महामार्गावरील वाके फाट्याजवळ कारवाई केली. कारवाईच्या भीतीपोटी ट्रकचालकांनी मुंगसे उपबाजाराच्या आवारात ट्रक उभ्या केल्या होत्या. तसेच वाके, मुंगसे, नांदगाव शिवारातील वेगवेगळ्या रस्त्यांवर ट्रक पळवून नेल्या होत्या; मात्र महसूल व उपप्रादेशिक परिवहन विभागाने धडक कारवाई करीत १९ ट्रक जप्त केल्या आहेत. या ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा अधिक वाळू असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे एका ब्रासला २६ हजार ६९५ एवढा दंड करण्यात येणार आहे. महसूल विभागाने १९ ट्रकवर पाच लाख १३ हजाराचा दंड आकारला आहे, तर उपप्रादेशिक परिवहन विभागाचे मोटार वाहन निरीक्षक योगेश मोरे यांनी ट्रक्स्चे वजन करुन नऊ लाख ५० हजार रूपये दंड आकारला आहे. रात्री उशिरापर्यंत दंडात्मक कारवाई सुरू होती. या धडक कारवाईमुळे महसूल आवाराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. ट्रक जप्त केल्यानंतर चालक व मालकांनी तहसील आवारात गर्दी केली होती. या पथकात प्रांत अधिकारी मोरे, तहसीलदार डॉ. कोळी यांच्यासह वसंत पाटील, प्रशांत काथेपुरी, जे. ए. संसारे आदिंसह इतर तलाठ्यांचा समावेश होता. दरम्यान, क्षमतेपेक्षा अधिक वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करण्याचे धारिष्ट्य येथील महसूल प्रशासनाने दाखविले. मात्र तालुक्यातील मोसम - गिरणा व इतर नदीपात्रांमधून राजसोसपणे वाळू चोरी होत आहे. तसेच तालुक्यात अवैध वाळू उपसा होत असताना परजिल्ह्यातून येणाऱ्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला; मात्र स्थानिक वाळू चोरट्यांना प्रशासनाकडून अभय दिले जात आहे.

Web Title: 19 trucks seized more than capacity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.