वीज वितरणला १८ हजारांचा दंड
By Admin | Updated: March 23, 2016 22:31 IST2016-03-23T22:29:38+5:302016-03-23T22:31:15+5:30
नांदगाव : रोहित्र बदलवून न दिल्याने दणका

वीज वितरणला १८ हजारांचा दंड
नांदगाव : मुदतीत रोहित्र बदलवून न दिल्याने वीज वितरण कंपनीला १८ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. ग्राहक गाऱ्हाणे निवारण मंचने हा निकाल येथील शेतकरी उत्तम सौंदाणे यांच्या बाजूने देताना कंपनीला ‘हे वागणे बरे नव्हे’ याची जाणीव करून देत कंपनीची कृती चांगल्या व्यवस्थापनाचे लक्षण नसल्याचा टोला लगावला आहे.
रोहित्र नादुरुस्त झाले की, शेतकऱ्यांचे धाबे दणाणतात. कंपनीचा रोहित्र देण्यातला विलंब सार्वजनिक ज्ञात आहे. रोहित्र मिळविण्यासाठी चिरीमिरीपासून तर वाहतुकीपर्यंत सर्व काही करावयास शेतकरी मजबुरीने तयार होतात कारण शेतात पीक उभे असते.
रोहित्रामधील बिघाडामुळे खंडित झालेला वीजपुरवठा तक्रार प्राप्त झाल्यापासून ग्रामीण भागात ४८ तासांच्या आत देणे विद्युत नियामक आयोगाच्या नियमानुसार बंधनकारक आहे. सौंदाणे यांचा वीजपुरवठा गेल्या वर्षी मार्च ते मे महिन्यापर्यंतच्या कालावधीत तब्बल ३२ दिवस रोहित्र नादुरुस्त झाल्याने बंद पडला होता. त्यांनी नियमाचा पाठपुरावा केला.
परिणामी ग्राहक गाऱ्हाणे निवारण मंचने १४ दिवसांचा खंड मान्य करून ताशी ५० रु.प्रमाणे १८ हजारांची भरपाई देण्याचा आदेश वीज वितरण कंपनीला दिला. वीज वितरण कंपनीकडून ग्राहकांच्या तक्रारींना केराची टोपली दाखविली जाते. याचा अनुभव सौंदाणे यांना वरील प्रकरणाचा पाठपुरावा करताना आला. कंपनीच्या वरिष्ठ कार्यालयातील मंचाकडून अखेर त्यांना दोन वर्षांनी न्याय मिळाला. क्षमता लहान व भार मोठा झाल्यामुळे रोहित्र वारंवार नादुरुस्त होत असे. ६३ केव्ही क्षमतेच्या रोहित्रावर क्षमतेपेक्षा अधिक विद्युत भार देण्यात आला. ही वीज कंपनीची चूक होती. निवारण मंचाने निकालपत्रात नमूद केले आहे की, रोहित्राची क्षमता नसताना त्या रोहित्रावर ग्राहकांना जोडण्या देणे व कमी क्षमतेचे रोहित्र टाकणे हे चांगल्या व्यवस्थापनाचे लक्षण नाही. (वार्ताहर)