174 वृक्षतोडीचा प्रस्ताव
By Admin | Updated: March 23, 2016 23:35 IST2016-03-23T23:35:10+5:302016-03-23T23:35:43+5:30
वनविभागाचा नकार : पांडवलेणीजवळील वनौषधी उद्यानात अडथळा

174 वृक्षतोडीचा प्रस्ताव
नाशिक : पांडवलेणीच्या पायथ्याशी असलेल्या नेहरू वनोद्यानातील ९३ हेक्टर जमिनीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या संकल्पनेतील वनौषधी उद्यानाच्या उभारणीस प्रारंभ झाला असला तरी गेल्या काही दिवसांत तेथे होणाऱ्या वृक्षतोडीला पर्यावरणवाद्यांनी हरकत घेतलेली आहे. त्यातच महापालिकेने वनौषधी उद्यानात तयार करण्यात येणाऱ्या पाथवेच्या मार्गात सुमारे १७४ वृक्ष येत असल्याने त्यांची तोड करण्याचा प्रस्ताव वनविभागाकडे पाठविला आहे; परंतु सदर वृक्षतोडीस वनविभागाने नकार दिला असून अद्याप त्यास मंजुरी दिलेली नसल्याचे समजते.
पांडवलेणीच्या पायथ्याशी असलेल्या वनखात्याच्या नेहरू वनोद्यानात वनौषधी उद्यानाच्या माध्यमातून एक पर्यटनस्थळ विकसित करण्याचे स्वप्न मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पाहिले आहे. वनौषधी उद्यानात मंच, पॅगोडा, कॉफीशॉप, जॉगिंग ट्रॅक, रोप वे, पेरिफेरियल वॉक वे आदि सुविधा उभारण्याचे नियोजन असून एक पर्यटन स्थळ विकसित केले जाणार आहे. त्यासाठी वनविभागाने ९३.९६७ हेक्टर जागा वनविकास महामंडळाकडे हस्तांतरित केली आहे आणि त्याठिकाणी वनौषधी उद्यान साकार होण्यासाठी वनविकास महामंडळ व नाशिक महापालिका यांच्यात एक सामंजस्य करारनामा करण्यात आला आहे. सदर उद्यान विकसित करण्याची जबाबदारी टाटा ट्रस्टने आपल्या शिरावर घेतली असल्याने या उद्यानासाठी महापालिकेला एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही. महासभेने केलेल्या करारनाम्यात अत्याधुनिक उद्यान साकारण्याचा आणि त्याठिकाणी पर्यटनस्थळ विकसित करण्याचे नमूद केले होते.