पाणीपुरवठा योजनांकडे १६ कोटींचे वीज बिल महावितरण : पथदीपांचेही कोट्यवधी थकीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 01:22 IST2018-02-05T01:21:57+5:302018-02-05T01:22:36+5:30
नाशिक : नाशिक परिमंडळातील ६०४ पाणीपुरवठा योजनांकडे १६ कोटी ७९ लाख रुपयांचे व पथदिव्यांच्या १२० ग्राहकांकडे तीन कोटी ८८ लाख रु पये वीज बिल थकीत आहे.

पाणीपुरवठा योजनांकडे १६ कोटींचे वीज बिल महावितरण : पथदीपांचेही कोट्यवधी थकीत
नाशिक : नाशिक परिमंडळातील ६०४ पाणीपुरवठा योजनांकडे १६ कोटी ७९ लाख रुपयांचे व पथदिव्यांच्या १२० ग्राहकांकडे तीन कोटी ८८ लाख रु पये वीज बिल थकीत आहे. संबंधित ग्राहकांनी थकीत बिलांचा तातडीने भरणा करून भविष्यातील कटू कार्यवाही टाळावी, असे आवाहन मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी केले आहे. नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील १७६७ पाणीपुरवठा योजनांना व पथदीपांसाठी ग्रामपंचायती वगळून १४१ स्थानिक स्वराज्य संस्थांना महावितरणकडून वीज पुरवठा करण्यात येतो. पाणीपुरवठा योजनांच्या एकूण ग्राहकांपैकी जवळपास ३५ टक्के ग्राहकांनी (६०४ योजना) गेल्या तीन महिन्यांपासून एकदाही वीज बिलाची रक्कम भरलेली नाही. या सर्वच योजनांकडे थकीत असलेले बिल दहा हजार रुपयांपेक्षा अधिकचे आहे, तर पथदीपांच्या एकूण ग्राहकांपैकी तब्बल ८५ टक्के ग्राहकांनी वीज बिलाची रक्कम थकवली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून वीज बिल न भरलेल्या व दहा हजार रु पयांपेक्षा अधिकची थकबाकी असलेल्या ग्राहकांची ही आकडेवारी आहे. महावितरणने थकीत बिल वसुलीसाठी सवलत योजना जाहीर केलेली आहे. मात्र अद्यापही ग्राहकांकडून पुरेसी थकीत बिल वसुली होऊ शकलेली नाही. पाणीपुरवठा योजना व पथदीपांच्या वीज बिल थकबाकीदारांच्या वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम महावितरणने हाती घेतली आहे. वीज पुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळण्यासाठी थकीत वीज बिलाचा तातडीने भरणा करून अखंडित सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य अभियंता कुमठेकर यांनी केले आहे.