नाशिकरोडला १५ हजार मूर्ती दान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:16 IST2021-09-21T04:16:48+5:302021-09-21T04:16:48+5:30
नाशिकरोड प्रतिनिधी : मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा देत नाशिकरोड परिसरामध्ये रविवारी मोठ्या ...

नाशिकरोडला १५ हजार मूर्ती दान!
नाशिकरोड प्रतिनिधी : मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा देत नाशिकरोड परिसरामध्ये रविवारी मोठ्या भक्तिभावाने लाडक्या श्री गणरायाचे विसर्जन करण्यात आले. दिवसभरात सुमारे १५ हजार घरगुती व सार्वजनिक मंडळाच्या मूर्ती दान करून संकलित करण्यात आल्या.
महापालिका आणि पोलीस प्रशासनाने देवळालीगाव, जेलरोड, चेहडी, विहीतगाव, वडनेरगाव नदीघाटावर गणेश विसर्जनाची जय्यत तयारी केल्यामुळे विसर्जन शांततेत व सुरक्षितपणे पार पडले. घाटांवर गणेश भक्तांची गर्दी होऊन कोरोना संसर्ग फैलावू नये म्हणून प्रत्येक प्रभागात विसर्जन रथ तयार करून मोठ्या सोसायटी व नगरांमध्ये तो फिरवण्यात आला. त्याद्वारेही मूर्ती संकलन करण्यात आले. अनेक भाविकांनी शाडू मातीच्या व स्वतःहून घरी बनवलेल्या मूर्तींचे घरीच पिपाळ पाण्यामध्ये मूर्तीचे विसर्जन केले. प्रशासनाने नदी प्रदूषण टाळण्यासाठी विविध घाटांवर मूर्ती संकलन केंद्र सुरू केले होते. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. नाशिकरोडला फिरत्या विसर्जन रथात १३८ मूर्ती संकलित झाल्या. नागरिकांमध्ये यंदाही पर्यावरणाप्रति जागरूकता वाढली. त्यामुळे विभागात एकूण १४ हजार ९६८ मूर्ती संकलित झाल्या. तसेच अमोनियम बायकार्बोनेट पावडर ३६३ किलो वाटण्यात आली.
इन्फो
पंधरा टन निर्माल्य जमा
नाशिकरोड, जेलरोड, चेहडी, टाकळी, कॅनल रोडवरील मोठ्या अपार्टमेन्टसमोर विसर्जन रथामध्ये भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने मूर्तींचे विसर्जन केले. नाशिकरोडला एकूण १५ विसर्जन स्थळे होती. त्यातील सहा नदीकाठ तर आठ ठिकाणी कृत्रिम तलाव होते. नदीकाठी अग्निशमन, वैद्यकीय, जीवरक्षक पथक, रुग्णवाहिका तैनात करण्यात आले होते. विसर्जन परिसरात साफसफाई करून बॅरीकेट, मूर्ती संकलन केंद्र, निर्माल्य कलश, जीवरक्षक, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, स्वयंसेवकसह महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती यांचे नियोजन करण्यात आले होते. कोरोना संकटामुळे यावर्षीही मंडळांनी विसर्जन मिरवणूक काढली नाही. तथापी, मोजकीच मंडळ व सोसायट्यांनी मिरवणूक काढली.
इन्फो
घाटांवर थोडी गर्दी
जेलरोडचा दसक घाट, चेहेडीची दारणा नदी, देवळाली गावातील वालदेवी नदी, विहीतगाव, वडनेर गावची वालदेवी नदी येथे विसर्जनासाठी सायंकाळी थोड्या प्रमाणात गर्दी झाली होती. पोलीस व महापालिका प्रशासनाने नदीत मूर्ती विसर्जनास प्रतिबंध केल्याने भाविकांनी मूर्ती दान केल्या. नारायण बापू चौक, चेहडी ट्रक टर्मिनल्स, जय भवानी रोडवरील निसर्गोपचार केंद्र, शिखरेवाडी मैदान, गाडेकर मळा, महापालिका शाळा क्रमांक १२५ चे मैदान, जेलरोडचा राजराजेश्वरी चौक, के. एन केला शाळेमागील भाजी मार्केट येथे कृत्रिम तलावात भाविकांनी सहकुटुंब व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात लाडक्या गणरायाचे विसर्जन करून मूर्ती दान केल्या. सायंकाळी उशिरापर्यंत जवळपास सर्वच मूर्तींचे विसर्जन झाले होते. विसर्जन काळात कुठेही अनुचित प्रकार घडला नसून सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.