शहरात ११ हजार वृक्षरोपांची लागवड
By Admin | Updated: January 2, 2017 00:58 IST2017-01-02T00:58:25+5:302017-01-02T00:58:38+5:30
महापालिका : एका ठेकेदारावर दंडात्मक कारवाई

शहरात ११ हजार वृक्षरोपांची लागवड
नाशिक : महापालिकेमार्फत शहरात वृक्षलागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून २१ हजार वृक्षरोपांपैकी आतापर्यंत ११ हजार वृक्षरोपांची लागवड करण्यात आली आहे. दरम्यान, वृक्षलागवडीस विलंब लावणाऱ्या एका ठेकेदारावर दंडात्मक कारवाईचे पाऊल प्रशासनाने उचलले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, महापालिकेने शहरात २१ हजार वृक्षरोपांची लागवड करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी कल्पतरू कन्स्ट्रक्शन, महारुद्र एंटरप्रायझेस, भाग्यश्री कन्स्ट्रक्शन, ज्योती सोसायटी, टेरेकॉन इकोटेक प्रायव्हेट लिमिटेड या खासगी एजन्सीला काम देण्यात आले आहे. सदर एजन्सीकडून दहा फुटावरील वृक्षरोपांची लागवड केली जात आहे. आतापर्यंत कल्पतरू कन्स्ट्रक्शनने नाशिक पश्चिम व पंचवटी विभागात ६३८, सिडको व सातपूर विभागात ३३२, पंचवटी पेठरोड व दिंडोरीरोड परिसरात २६८५ तर पंचवटी विभागातच संगमपूल ते मिर्ची हॉटेल दरम्यान २९२५ वृक्षरोपांची लागवड केलेली आहे.
महारुद्र एंटरप्रायझेसने नाशिक पूर्व व नाशिकरोड विभागात ८५०, ज्योती सोसायटीने सिडकोत अंबड-लिंकरोड, पाथर्डी फाटा ते वडनेर गेट, कलानगर ते पाथर्डी गाव या परिसरात २७६८, टेरेकॉन इकोटेकने पश्चिम विभागात जेहान सर्कल ते लोकमत सर्कल ते एबीबी सर्कल तसेच सिटी सेंटर मॉलपर्यंत परिसरात ७९२ वृक्षरोपांची लागवड केलेली आहे. आतापर्यंत २१ हजार वृक्षरोपांपैकी ११ हजार २२८ वृक्षरोपांची लागवड करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त अनिल चव्हाण यांनी दिली. दरम्यान, भाग्यश्री कन्स्ट्रक्शनने सातपूर विभागात केवळ २३८ वृक्षरोपांची लागवड केलेली आहे, तर पूर्व विभागात अद्याप लागवडीस प्रारंभ न केल्याने महापालिकेने संबंधित एजन्सीवर दंडात्मक कारवाईचे पाऊल उचलले आहे. (प्रतिनिधी)