१०० रुग्णांची व्यवस्था; दहा रुग्णवाहिकांची मागणी
By Admin | Updated: February 13, 2015 01:28 IST2015-02-13T01:26:56+5:302015-02-13T01:28:16+5:30
र्यंबक ग्रामीण रुग्णालय पूर्णत्वाकडे

१०० रुग्णांची व्यवस्था; दहा रुग्णवाहिकांची मागणी
त्र्यंबकेश्वर : सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर १०० खाटांच्या रुग्णालयाने आकार घेतला असून, आता फक्त रंगरंगोटी बाकी आहे. यासाठी सुमारे एक कोटी ३५ लक्ष रुपये खर्च होणार असल्याची माहिती डॉ. भागवत लोंढे यांनी दिली. विशेष म्हणजे, रुग्णालय जरी खास सिंहस्थासाठी बांधले असले, तरी ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालयदेखील मंजूर झाले असल्याने सध्याच्या ग्रामीण रुगणालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर होणार आहे. त्यामुळे आपोआप स्टाफदेखील वाढणार आहे.
खास सिंहस्थासाठी ७० खाटांची इमारत नव्याने बांधण्यात आली असून, सध्याच्या ३० खाटा तशाच राहणार आहेत. तेथे एकाच वेळी १०० रुग्णांची व्यवस्था होणार आहे. त्यासाठी सध्या २७ जणांचा स्टाफ असून, एक वैद्यकीय अधीक्षक व तीन वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. नव्याने २९१ कर्मचारी प्रतिनियुक्तीवर बोलावण्यात आले आहेत.
रुग्णालयात ग्रामीण रुग्णालयाच्या दोन रुग्णवाहिका, १०८ कॉलच्या पाच रुग्णवाहिका व दहा रुग्णवाहिकांची सिंहस्थासाठी मागणी करण्यात आली आहे. म्हणजे एकाच वेळी १७ रुग्णवाहिका कार्यरत राहणार आहेत.
सिंहस्थासाठी बांधलेल्या रुग्णालयात कॉटसह साधनसामग्री, उपकरणे अद्याप यावयाची आहेत. त्यामुळे त्र्यंबककर व परिसरातील गावकऱ्यांना या रुग्णालयाचा सिंहस्थ संपल्यावर चांगलाच उपयोग होणार आहे. (वार्ताहर)