ओझर ग्रामपालिकेच्या निवडणुकीत १० जागा बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 21:03 IST2021-01-04T21:03:34+5:302021-01-04T21:03:48+5:30
ओझर : येथील नगरपरिषदेच्या उद्घोषणेनंतरही जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अर्ज माघारीच्या दिवशी माजी आमदार अनिल कदम यांच्या गटाने माघार घेतल्यामुळे नागरिक आघाडीच्या दहा जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत, तर एकूण चार वॉर्डात सात जागांसाठी निवडणूक होणार आहे.

ओझर ग्रामपालिकेच्या निवडणुकीत १० जागा बिनविरोध
ओझर : येथील नगरपरिषदेच्या उद्घोषणेनंतरही जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अर्ज माघारीच्या दिवशी माजी आमदार अनिल कदम यांच्या गटाने माघार घेतल्यामुळे नागरिक आघाडीच्या दहा जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत, तर एकूण चार वॉर्डात सात जागांसाठी निवडणूक होणार आहे.
मागील महिन्यात चार डिसेंबर रोजी शासनाच्या नगरविकास विभागाने राज्यातील १३ ग्रामपंचायतींची पदोन्नत्ती करण्याचे ठरविले होते. यात ओझर ग्रामपालिकेचा देखील समावेश होता. विशेष म्हणजे ओझरची प्रशासकीय प्रक्रिया सर्वांत पुढे असताना निवडणूक आयोगाने त्या आधीच निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याने न्यायालयाने कमी कालावधीसाठी का होईना, आपला निर्णय कायम ठेवला. सुरुवातीला दोन पॅनलमध्ये सरळ लढत दिसत असताना शिवसेनेच्या सर्व उमेदवारांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकत अर्ज माघारी घेतले. त्यामुळे एकूण पाच वॉर्डात दहा उमेदवार हे नागरिक आघाडीचे बिनविरोध निवडून आले आहेत, तर प्रभाग २, ४, ५ व ६ मध्ये सात जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.
-------------------
दिंडोरी पॅटर्नची आठवण
२०१५ मध्ये दिंडोरी ग्रामपालिकेचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्यानंतर तेथील सर्वच नागरिकांनी ग्रामपालिकेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता, त्यामुळे लगेच सहा महिन्यांत शासनाने प्रक्रिया गतिमान केली व नगरपंचायत अमलात आली. ओझरच्या बाबतीत मात्र अनिल कदम गटाने माघार घेत थेट नगरपरिषद निवडणुकीत उतरण्याचे ठरवल्याने यतीन कदम गटाचे दहा उमेदवार बिनविरोध निवडून आले तर एका गटाने रिंगणात कायम राहण्याचा ठाम पवित्रा घेतला.
--------------
येत्या दोन महिन्यांत होऊ घातलेल्या नगरपरिषद निवडणुकीमुळे मतदारांना संभ्रमात न ठेवता शिवसेना ताकदीनिशी उतरणार आहे. गावातील जनतेने माघारीमुळे कोणत्याही प्रकारचा गैरसमज करून घेऊ नये. घोषणेनंतर हरकतीचा कालावधी संपल्याने नगरपरिषदेचा मार्ग मोकळा झाला आहे.
-अनिल कदम, माजी आमदार