धजापाणी येथे जि.प. शाळा भरते कुडाच्या झोपडीतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 01:11 PM2020-10-27T13:11:51+5:302020-10-27T13:11:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : सातपुड्याच्या कुशीत तळोदा तालुक्यात वसलेले धजापाणी हे गाव मालदा ग्रुपग्रामपंचायती अंतर्गत येते. गावात सुमारे ...

Z.P. at Dhajapani. The school is full of garbage | धजापाणी येथे जि.प. शाळा भरते कुडाच्या झोपडीतच

धजापाणी येथे जि.प. शाळा भरते कुडाच्या झोपडीतच

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
कोठार : सातपुड्याच्या कुशीत तळोदा तालुक्यात वसलेले धजापाणी हे गाव मालदा ग्रुपग्रामपंचायती अंतर्गत येते. गावात सुमारे १०० हून अधिक कुटूंब राहत असून गावात मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध नसून त्या मिळविण्यासाठी ग्रामस्थांना संघर्ष करावा लागत आहे. येथे जिल्हा परिषदेची शाळा आहे मात्र ही शाळा कुडाच्या झोपडीत भरवली जाते.
दरम्यान, कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्या तरी जेव्हा शाळा सुरू होतील तेव्हा धजापाणी येथील विद्यार्थांना या झोपडीतच शिक्षण घ्यावे लागणार आहे. 
धजापाणी ग्रामस्थ रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण या मुलभूत समस्यांपासून आजही कोसोदूर असल्याचे चित्र आहे. धजापाणी येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग असून येथे द्विशिक्षकी शाळा कार्यरत आहे. मात्र शाळेत पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्याचे चित्र असून पक्क्या इमारतीअभावी ही शाळा कुडाच्या भिंतीत असणाऱ्या झोपडीत भरत असल्याची स्थिती आहे. सर्वत्र डिजिटल व अत्याधुनिक शिक्षणाच्या गवगवा केला जात असताना धजापाणी येथील विद्यार्थ्यांना  मात्र पायाभूत सोयी-सुविधाही उपलब्ध नसल्याचे विदारक चित्र आहे. पायाभूत सुविधांचा एवढ्या मोठ्या प्रमाणात अभाव असताना कोरोनाच्या काळात ई-लॅर्निंग, डिजीटल लर्निंग यासारख्या गोंडस संकल्पना या केवळ दिवास्वप्नच ठरत आहेत.
यासोबतच पाण्याची मोठी समस्या धजापाणी ग्रामस्थांना आहे. महिला व लहान मुलांना डोंगरदऱ्यात भटकंती करत नाला किंवा झिऱ्यातून पाणी आणावे लागते. चढ-उताराच्या डोंगरावरुन पायपीट करीत पाणी आणण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागतो. या गावात दोन-तीन वर्षापूर्वी वीज पोहोचली. मात्र घरापर्यंत ही वीज पोहोचली नसल्याने ती असून नसल्यासारखी आहे. या समस्यांकडे लोकप्रतिनिधींसह प्रशासनाने लक्ष घालून मुलभूत सुविधांअभावी येथील ग्रामस्थांचे हाल थांबविण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

आरोग्य सुविधेचाही अभाव
धजापाणी गावात आरोग्याची कोणत्याही प्रकारची सोय नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. करडे येथील आरोग्य उपकेंद्राअंतर्गत धजपाणी गाव येत असल्याने केवळ सरकारी लसीकरण,सर्वेक्षण अशा कामांसाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी गावात येत असल्याचा अनुभव आहे. गरोदर मातांना आरोग्य केंद्रात घेऊन जायला व घरी सोडायला रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली जात असली तरी रस्त्याअभावी ‘बांबूलन्स’ या पर्यायाचा वापर ग्रामस्थांना करावा लागतो. धजापाणी हे अतिदुर्गम भागात असणारे गाव असून पुरेशा लोकसंख्येअभावी येथे उपकेंद्र नसल्याचे सांगितले जाते. मात्र रस्त्याचा अभाव व प्रतिकूल भौगोलिक परिस्थिती यामुळे गावात कायमस्वरूपी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे.

Web Title: Z.P. at Dhajapani. The school is full of garbage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.