यंदा जिल्ह्यात ७६५ मंडळांकडून बाप्पाची होणार स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:37 IST2021-09-10T04:37:10+5:302021-09-10T04:37:10+5:30
मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात यंदा २३२ खासगी, ४२५ सार्वजनिक मंडळांकडून मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील १०८ गावात एक ...

यंदा जिल्ह्यात ७६५ मंडळांकडून बाप्पाची होणार स्थापना
मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात यंदा २३२ खासगी, ४२५ सार्वजनिक मंडळांकडून मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील १०८ गावात एक गाव एक गणपतीची स्थापना करण्यात येणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांना यंदा स्थानिक नगरपालिका व प्रशासन यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक करण्यात आले आहे. त्यानुसार मंडळांकडून कामकाज सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
कोरोना आटोक्यात आला असल्याने वर्षभरानंतर बाजारात चैतन्य दिसून आले. नंदुरबार शहरातील अंधारे चाैक ते मोठा मारुती दरम्यान मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा गणेशमूर्तींची दुकाने सजली आहेत. एकलव्य हायस्कूल परिसर, स्टेशन रोड तसेच शहरातील विविध भागात गणेशमूर्ती विक्रीची दुकाने थाटण्यात आली आहेत. याठिकाणी गुरुवारी सकाळी सात वाजल्यापासून गणेशमूर्ती खरेदीसाठी गर्दी झाली होती. गणेश चतुर्थीला गर्दी होण्याची शक्यता अधिक असल्याने नागरिक एक दिवस आधीच बाप्पाला घरी घेऊन जाण्यास प्राधान्य देत असल्याचे दिसून आले. गेल्या वर्षी कोरोनामुळे शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार मूर्तीची उंची चार फूटापेक्षा अधिक नसावी असे आदेश काढण्यात आल्याने मूर्तिकारांचे नुकसान झाले होते. यंदा मूर्तिकारांकडून लहान आकाराच्याच मूर्ती तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. बहुतांश मूर्तिकारांकडून बुकींगनुसार मूर्ती तयार केल्याचे सांगण्यात आले आहे.
एकीकडे गणेश मूर्ती विक्रेत्यांचे गेल्यावर्षी झालेले नुकसान भरून निघणार असल्याचे चित्र असताना दुसरीकडे सजावटीचे साहित्य विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनाही यंदा बाप्पा पावणार असल्याचे दिसून आले आहे. साधेपणाने उत्सव साजरा होणार असला तरी घरगुती उत्सवाला मात्र बंधने नाहीत. घरात प्रत्येक जण आपल्या परीने सजावट करणार आहे. यातून सजावटीचे साहित्य, मखर यासह विविध वस्तू विक्री करणाऱ्यांकडे मोठी गर्दी होत असल्याचे दिसून आले. यातून गेल्या तीन दिवसांतच मोठी उलाढाल झाल्याची माहिती देण्यात आली आहे.