दुस-या रेल्वे बोगद्याचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 12:45 IST2020-11-06T12:45:34+5:302020-11-06T12:45:42+5:30
n लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गेल्या अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा लागून राहिलेल्या शहरातील दुसऱ्या रेल्वे बोगद्याच्या कामाला सुरुवात झाले ...

दुस-या रेल्वे बोगद्याचे काम सुरू
n लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : गेल्या अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा लागून राहिलेल्या शहरातील दुसऱ्या रेल्वे बोगद्याच्या कामाला सुरुवात झाले आहे. नळवा रस्त्यावर पहिल्या बोगद्याच्या शेजारीच हा बोगदा बसविण्यात येत आहे. तीन वर्षांपासून तयार करून ठेवण्यात आलेला बोगदा रेल्वेच्या परवानगीअभावी बसविला जात नव्हता. परंतू रेल्वेने कामाला आता परवानगी दिली असून कामाला सुरूवात झाली आहे.
शहरातून गेलेल्या रेल्वे मार्गामुळे शहराचे दोन भागात विभाजन झाले आहे. पूर्वी रेल्वे गेटमुळे वाहतुकीचा ताण होता. परंतु दहा वर्षांपूर्वी उड्डाणपुल बांधण्यात आल्यानंतर थोडीफार समस्या सुटली आहे. उड्डाणपुलासह नळवा रस्त्यावर बोगद्याद्वारे देखील वाहतूक केली जाते. परंतु एकच बोगदा असल्यामुळे एकाचवेळी दोन वाहने जाऊ शकत नाहीत. शिवाय चारचाकी वाहनांना देखील मर्यादा असतात. त्यामुळे या रस्त्यावर दुसरा बोगदा असावा यासाठीची मागणी करण्यात येत होती.
आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आघाडी शासन काळात त्यासाठी निधी मंजुर करून घेतला होता. परंतु निधी मंजुर होताच निवडणुका लागल्या आहे भाजप सरकार सत्तेत आले. ही त्यामुळे निधी अडकला. त्यानंतर आमदार रघुवंशी यांनी पाठपुरावा करून निधी मिळविला. तो पालिकेकडे वर्ग देखील झाला. दोन वर्षांपूर्वी बोगदा कामाची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानुसार नाशिक येथील एका कंपनीला हे काम मिळाले. कंपनीने सर्व्हे करून कामाला सुरुवात केली होती. नगरपालिका निवडणुकांच्या आधीच हे काम होणार असे बोलले जात होते. परंतु तांत्रिक अडचणींमुळे ते होऊ शकले नव्हते. आता हे काम सुरू झाले असल्साने दिलासा मिळाला असून कामाला गती दिली जात असल्याचे चित्र आहे.
एक कोटीचा निधी
नळवा रस्त्यावरील रेल्वे बोगद्याचे काम हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे करण्यात येत आहे. सिमेंट काँक्रीटद्वारे बोगदा आधी बाहेर तयार करण्यात आला आहे. आता हा बोगदा रेल्वे रुळाच्या खालील जागेत बसविण्यात येणार आहे. यामुळे वेळेचीही बचत होईल आणि रेल्वे गाड्यांच्या वाहतुकीलाही फारसा अडथळा येणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. या बोगद्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजुर आहे.
नवीन बोगदा झाल्यास या मार्गाने प्रवास करणारे दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना ते सोयीचे ठरणार आहे. आधीच बोगदा ते थेट नळवा हद्दीपर्यंत रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येवून मध्ये दुभाजक व पथदिवे लावण्यात आले आहेत. दुसरा बोगदाही येत्या काही दिवसात पूर्ण होणार असल्याने शहराच्या साैंदर्यीकरणार वाढच होणार आहे.