सरी येथील महिलेला डाकीण ठरवून जीवे मारण्याची धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:06 IST2021-09-02T05:06:24+5:302021-09-02T05:06:24+5:30
कोठार : अक्कलकुवा तालुक्यातील सरी येथील महिलेला डाकीण ठरवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली जात आहे. याबाबत पोलिसांना सूचित ...

सरी येथील महिलेला डाकीण ठरवून जीवे मारण्याची धमकी
कोठार : अक्कलकुवा तालुक्यातील सरी येथील महिलेला डाकीण ठरवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली जात आहे. याबाबत पोलिसांना सूचित करूनदेखील दोषींवर कारवाई होत नसल्याने बुधवारी पीडित महिलेने जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रशासनाला निवेदन दिले.
दरम्यान, पीडित महिलेने निवेदनात म्हटले आहे की, मी सरी या गावाची रहिवासी असून, गावातील पंच आणि संबंधित व्यक्तीने माझ्यावर मी डाकीण असल्याचा ठपका ठेवून मला शारीरिक व मानसिक त्रास दिला जात आहे. माझे सामाजिक जीवन संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. गावामध्ये गावात कोणी आजारी पडले, कोणाचा मृत्यू झाला, महिलांना लहान-लहान आजार झाले किंवा गावात कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडल्यास त्याचा ठपका माझ्यावर ठेवण्यात येतो. हे सर्व माझ्यामुळे होत आहे, असा समज निर्माण करून मला गावाच्या बाहेर काढण्याचे आदेश दिले जातात, असे पीडित महिलेने जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
गावातील संबंधित व्यक्तींकडून पीडित महिलेला आजदेखील त्रास दिला जात असून, तिचे जीवन जगणे असह्य झाले आहे. पीडितेच्या कुटुंबाला विविध त्रासांना सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भात पीडित महिलेच्या कुटुंबीयांनी राज्य महिला आयोग व महिला बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद नंदुरबार यांच्या अंतर्गत सुरू असलेल्या महिला समुपदेशन केंद्र अक्कलकुवा या ठिकाणी अर्ज केला होता. त्यानुसार पीडित महिलेच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी अक्कलकुवा महिला बाल समुपदेशन केंद्र या कार्यकर्त्या व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पीडित महिलेने जिल्हाधिकारी मनीषा खत्री व जिल्हा पोलीस प्रशासनाला या संदर्भात निवेदन दिले आहे. दोषींविरोधात कारवाई करण्यात यावी व पीडित महिला गावात सन्मानाने जगता यावे, अशी विनंती निवेदानाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनावर पीडित महिलेसह कुटुंबीयांच्या व महिला समुपदेशन केद्राचे जिल्हा समन्वक राहुल जगताप, सुमित्रा वसावे, शीतल जावरे, दिनेश पाटोळे, जमीला पाडवी, सुषमा बिऱ्हाडे आदींच्या सह्या आहेत.
आरोपींविरोधात केवळ नोंद
यापूर्वी पीडित महिलेने मोलगी पोलीस ठाण्यातही या संदर्भात अर्ज दिला आहे. मात्र, संबंधित संशयित आरोपी यांच्याविरोधात कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप निवेदनात पीडित महिलेने केला आहे. महिलेला डाकीण ठरवणाऱ्या लोकांची यादीदेखील पीडित महिलेने मोलगी पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यांना दिली असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. असे असताना आरोपींच्या विरोधात केवळ नोंद केली आहे.