फ्लॅटमध्येही पेटवायच्या का चुली; गॅस दरवाढीने गृहिणी झाल्या हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:34 IST2021-09-05T04:34:38+5:302021-09-05T04:34:38+5:30
नंदुरबार : दर महिन्याला होणाऱ्या गॅस सिलिंडर दरवाढीमुळे सामान्य कुटुंबाचे कंबरडे मोडले आहे. आर्थिक बजेट सांभाळताना नाकीनऊ येऊ लागले ...

फ्लॅटमध्येही पेटवायच्या का चुली; गॅस दरवाढीने गृहिणी झाल्या हैराण
नंदुरबार : दर महिन्याला होणाऱ्या गॅस सिलिंडर दरवाढीमुळे सामान्य कुटुंबाचे कंबरडे मोडले आहे. आर्थिक बजेट सांभाळताना नाकीनऊ येऊ लागले आहेत. वर्षभरात २९० रुपयांनी स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचे दर वाढले आहे.
दुसरीकडे उज्ज्वला गॅस योजनेचे सिलिंडर धूळखात पडले आहेत. एकदा भरून मिळाल्यानंतर नंतर भरण्यासाठी पैसेच नसल्याने दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना त्याचा काहीएक लाभ होत नसल्याचे चित्र आहे.
महागाई पाठ सोडत नसल्याने सर्वसामान्यांचे हाल होत आहे. रोजच्या गरजांमध्ये अत्यावश्यक असलेले गॅस सिलिंडरही दरमहा २५ रुपयांनी वाढत असल्याने महिन्याचे बजेट बिघडत आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यापासून २९० रुपयांची दरवाढ झाली आहे. दरमहा सिलिंडरची भाववाढ नवा उच्चांक गाठत असून ही दरवाढ अशीच कायम राहिली तर शहरी भागातील घरांमध्येही चुली पेटविल्याशिवाय पर्याय राहणार नाही. वारंवार होणाऱ्या गॅस दरातील वाढ सर्वसामान्य नागरिकांना अडचणीत टाकणारी आहे. त्यामुळे प्रत्येक घरातील आर्थिक बजेट कोलमडेल.
nघराघरामध्ये आता सिलिंडचा वापर वाढला असून या वर्षात तब्बल १९० रुपयांची दरवाढ झाली आहे. दर महिन्याला २५ रुपयांची दरवाढ होत आहे. मात्र, सिलिंडरवर मिळणारी सबसिडी दिवसेंदिवस कमी होत आहे.
nयावर्षी जानेवारी महिन्यांपासून ग्राहकांना केवळ ४० रुपये इतकी नाममात्र सबसिडी मिळत आहे. बऱ्याच ग्राहकांच्या खात्यात नियमित जमाही होत नसल्याची ओरड आहे.
nदोन वर्षांपासून मोदी सरकारने गॅस सिलिंडरवरील सबसिडीही बंद केली आहे. त्यामुळे सामान्य नागरिक आणखीच अडचणीत सापडला आहे.
n कोरोनामुळे व्यवसायावर मंदीचे सावट असताना शासनाकडून मदतीची गरज असतांना वारंवार व्यावसायिक गॅसचे दर वाढविले जात आहे.
n असेच दर कायम वाढत असतील तर व्यवसाय बंद करण्याची वेळ व्यवसायिकांवर येणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून आपण हातगाडीवर खाद्यपदार्थ विक्री करीत आहोत. रॅाकेल मिळत नसल्याने तीन वर्षांपूर्वी गॅस सिलिंडर व शेगडी घेऊन त्यावर खाद्यपदार्थ तयार करून विक्री करू लागलो. परंतु आताच्या परिस्थितीत सिलिंडरचे वाढलेले दर परवडणारे नाहीत. नफा निघणे दुरापस्त झाले आहे. त्यामुळे सिलिंडरचे दर कमी होणे गरजेचे आहे.
-सी.वाय.पवार, खाद्यपदार्थ विक्रेता.
गॅस दरवाढीने महिन्याचे बजेटच कोलमडले आहे. शहरी भाग असल्याने चांगल्या वस्तीत राहावे लागते. अशा वेळी घरात चूल पेटविणे म्हणजे मोठे दिव्य आहे. जर गॅस दरवाढ अशीच सुरू राहिली तर चुलीचा पर्याय देखील निवडावा लागणार असे दिसते. शासनाने गॅस दरवाढीबाबत विचार करणे गरजेचे आहे.
-सुरेखा जाधव, गृहिणी.