लोकमत न्यूज नेटवर्कब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी येथील शेतात केळीने भरलेल्या ट्रकने अचानक पेट घेतल्याने केळीबरोबर ट्रकमध्ये ठेवलेली रोख रक्कम जळून खाक झाल्याची घटना गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. अचानक लागलेल्या आगीमुळे मजूर व शेतकऱ्यांची धावपळ उडाली.सविस्तर वृत्त असे की, ब्राह्मणपुरी येथील शेतकरी भिक्कन पूना पाटील यांचे ब्राह्मणपुरी शिवारात शेत आहे. त्यांच्या शेतात गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास केळी कापणी सुरू होती. केळी भरण्यासाठी आलेला ट्रक (क्रमांक एच.आर.७४ -७४७१) उभा होता. अचानक ट्रकमध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे ट्रकने पेट घेतला. लागलीच जवळ असलेल्या शेतकऱ्यांसह मजुरांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु आग मोठ्या प्रमाणावर असल्याने काहीकाळ दमछाक केल्यानंतर आग विझविण्यात यश आले. परंतु यात रोख रक्कमेसह केळी जळून खाक झाली. यात ट्रक मालकासह शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
शेतात उभा ट्रक अचानक पेटतो तेव्हा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 12:19 IST