लघु व मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठा अवघा ३५ टक्के टंचाईचे भीषण संकट, जमिनीतील पाणी पातळीही जातेय खोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:35 IST2021-09-06T04:35:13+5:302021-09-06T04:35:13+5:30
पाणीसाठा झालाच नाही यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यातील ३७ लघु व सहा मध्यम प्रकल्पांमध्ये पाणीसाठा झालाच नाही. पाऊसच नसल्याने नदी, नाले ...

लघु व मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठा अवघा ३५ टक्के टंचाईचे भीषण संकट, जमिनीतील पाणी पातळीही जातेय खोल
पाणीसाठा झालाच नाही
यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यातील ३७ लघु व सहा मध्यम प्रकल्पांमध्ये पाणीसाठा झालाच नाही. पाऊसच नसल्याने नदी, नाले प्रवाही झाले नाहीत. त्यामुळे प्रकल्पांमध्ये पाण्याची आवक झालीच नाही. परिणामी पाणीसाठा वाढण्याऐवजी तो कमी झाल्याचे चित्र यंदाच्या पावसाळ्यात दिसून येत आहे. यंदा जून महिन्यात जिल्ह्यातील प्रकल्पांमधील पाणीसाठा ४४ टक्के होता. तो कमी होऊन आता ३५ टक्क्यांवर आला आहे.
रब्बी हंगामाला फटका बसणार
प्रकल्पांमधील पाणीसाठ्याची स्थिती अशीच राहिल्याच रब्बी हंगामावर त्याचा परिणाम होणार आहे. कारण जिल्ह्यातील काही प्रकल्पांमधील पाण्याचे आवर्तन रब्बी हंगामासाठी सोडले जाते. त्या माध्यमातून काही शेतकरी पाणी घेतात. शिवाय नदी, पाटचारी यांना पाणी सोडण्यात आल्यावर त्या त्या भागातील विहिरी व कूपनलिकांना देखील बऱ्यापैकी पाणी येते. त्यावर शेतकरी रब्बीचे पीक घेत असतात. यंदा मात्र एकुणच चित्र बिकट राहण्याची शक्यता आहे.
जमिनीतील पाणी पातळी खालावली
पाऊस नाही, प्रकल्पांमध्ये पाणीसाठा नाही त्यामुळे जमिनीतील पाणी पातळी कमालीची खालावली आहे. गेल्या दोन वर्षात बऱ्यापैकी पाऊस असल्याने जमिनीतील पाणीपातळी खालावलेली नव्हती. यंदा ती दीड ते दोन मीटर किंवा त्यापेक्षा अधिक खालावण्याची शक्यता आहे. भूजल सर्वेक्षण विभाग पावसाळ्यानंतर निर्धारित केलेल्या निरीक्षण विहिरीतून पाणीपातळीची निश्चिती करीत असतात.
अनेक गावांना संकट
जिल्ह्यातील अनेक गावांत आतापासूनच पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ लागली आहे. गेल्या वर्षभरात पाणी टंचाई कृती आराखडा अंतर्गत ७८ गावांना टंचाई होती. यंदा ही संख्या तीन ते चार पट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.