आदिवासी पाड्यांवर गाढवांवरून पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 04:42 IST2019-05-20T04:42:39+5:302019-05-20T04:42:46+5:30
एका गाढवाला एका फेरीसाठी ७५ रुपयांची मजुरी दिली जाते तर गाढव ने-आण करणाºया पाच मजुरांना प्रत्येकी २०० रुपये मजुरी दिली जाते.

आदिवासी पाड्यांवर गाढवांवरून पाणी
रमाकांत पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : आदिवासी भागातील कुयरीडाबर (ता. तळोदा) गावाला जाण्यासाठी रस्ताच नसल्याने तेथे गाढवांद्वारे पाणी पुरवठा करण्याचा पर्याय प्रशासनाने शोधला आहे. या पर्यायानंतरही गावाला दरडोई फक्त तीन लीटर पाणीपुरवठा होतो.
माणसांची त्यातून जेमतेम तहान भागते पण वापरासाठी आणि जनावरांसाठी पाणी आणावे कुठून? असा प्रश्न येथील ग्रामस्थांपुढे पडला आहे.
कुयरीडाबर हे सातपुड्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या रांगेदरम्यान वसलेले गाव. गावाची लोकसंख्या ३१० आहे. रापापूरपर्यंत डांबरी रस्ता आहे. तेथून मात्र पायीच उंच डोंगर चढून सुमारे सहा किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. गावाला पाणी पुरवठ्यासाठी दोन विहिरी आहेत. त्यातील एक विहीर भ्रष्टाचारात बुडाली तर दुसरी विहिरही कोरडी झाली. रविवारपासून गावाला गाढवांद्वारे पाणी पुरवण्याची अंमलबजावणी सुरू झाली.
१७ गाढवे घेतली भाड्याने
पाणी पुरवठ्यासाठी १७ गाढव भाड्याने घेण्यात आले आहेत. गाढवांना ने-आण करण्यासाठी पाच मजूर आहेत. गाढवाच्या पाठीवर १५ लीटर पाण्याचे दोन ड्रम ठेवली जातात. तब्बल दोन तासानंतर ते कुयरीडाबरला पोहोचतात. प्रत्येक घरासाठी एक ड्रम दिला जातो. गावात एकूण ५६ घरे असल्याने दोन फेºया माराव्या लागतात.
एका गाढवाला एका फेरीसाठी ७५ रुपयांची मजुरी दिली जाते तर गाढव ने-आण करणाºया पाच मजुरांना प्रत्येकी २०० रुपये मजुरी दिली जाते. ग्रामपंचायतीच्या स्थानिक स्तर निधीतून या योजनेसाठी दोन लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. गावात ५९२ जनावरे आहेत. त्यांच्यासाठी पाणी व चारा नाही. शिवाय दैनंदिन वापरासाठी पाणी आणावे कुठून? त्याचे उत्तर कुणाकडेही नाही.
महाराष्ट्रासाठी ही खरोखरच एक लाजिरवाणी बाब असून सरकार व प्रशासनाने कुयरीडाबरसारखे अजूनही असंख्य गावे आहेत. तेथील पाणीप्रश्न कायमस्वरुपी सोडविण्याची गरज आहे.
-प्रतिभा शिंदे, लोकसंघर्ष मोर्चा.