सफाई कामगारांचा कामबंद आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:23 IST2021-05-28T04:23:17+5:302021-05-28T04:23:17+5:30
याबाबत शहादा पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या दीड वर्षापासून कोरोनाच्या महामारीमध्ये डॉक्टर, ...

सफाई कामगारांचा कामबंद आंदोलनाचा इशारा
याबाबत शहादा पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या दीड वर्षापासून कोरोनाच्या महामारीमध्ये डॉक्टर, पोलीस प्रशासनाप्रमाणेच सफाई कामगारही अविरत आपले कर्तव्य पार पाडत आहेत. सफाई कामगारांच्या नियमानुसार मागण्या पूर्ण करण्यात याव्यात. शहादा नगर परिषदेतील सर्व सफाई कामगार व त्यांच्या वारसांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेअंतर्गत हक्काचे घर बांधून मिळावे, सातव्या वेतन आयोगानुसार न.पा. निधी अथवा वित्त आयोगातून पहिला हप्ता रोखीने मिळावा, जे सफाई कामगार सेवानिवृत्त झाले आहेत त्यांना त्यांच्या सेवानिवृतीनंतर मिळणारे (उपदान, पी.एफ., रजा रोखीकरण आदी ) लाभ एकाचवेळी मिळावे अन्यया स्थायी निर्देश क्र.१६ नुसार कार्यवाही करावी, नगर परिषदेतील घनकचरा अंतर्गत ठेका पध्दतीत जे सफाई कामगार काम करतात त्यांच्या वेतनाची एक निश्चित तारीख करण्यात यावी व ठेकेदारांचा मनमानी कारभार थांबविण्यात यावा, जे खरे सफाई कामगार आहेत त्यांना प्राधान्य देण्यात यावे, ज्या सफाई कामगारांना आवाचित प्रगती योजनेअंतर्गत १२/२४ वर्षाची पदोन्नती देण्यात आलेली आहे त्यांची फरकाची रक्कम त्वरित देण्यात यावी यासह विविध मागण्या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत. या मागण्यांची पूर्तता न झाल्यास येत्या १० जून रोजी एकदिवसीय काम बंद (संप) आंदोलन करण्याचा इशाराही महापंचायतच्या वतीने देण्यात आला आहे. निवेदनावर अखिल भारतीय वाल्मीकी महापंचायतीचे शहादा तालुकाध्यक्ष संतोष गोजरे, उपाध्यक्ष डोडवे, सचिव गणेश डामरे यांच्यासह सफाई कामगारांच्या सह्या आहेत.