काॅन्टॅक्ट लेन्स वापरताय, काळजी न घेतल्यास होऊ शकते इजा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:34 IST2021-08-28T04:34:24+5:302021-08-28T04:34:24+5:30
नंदुरबार : डोळ्यांना चष्म्याऐवजी काॅन्टॅक्ट लेन्स लावण्याला अनेक जण पसंती देत आहेत. डोळ्याला चष्मा लावण्यापेक्षा काॅन्टॅक्ट लेन्सचा वापर करणाऱ्यांना ...

काॅन्टॅक्ट लेन्स वापरताय, काळजी न घेतल्यास होऊ शकते इजा!
नंदुरबार : डोळ्यांना चष्म्याऐवजी काॅन्टॅक्ट लेन्स लावण्याला अनेक जण पसंती देत आहेत. डोळ्याला चष्मा लावण्यापेक्षा काॅन्टॅक्ट लेन्सचा वापर करणाऱ्यांना मात्र लेन्सची काळजी कशी घ्यावी याची योग्य ती माहिती मिळत नसल्याने डोळ्यांना नुकसान होण्याचे प्रकार जिल्ह्यात वाढत आहेत.
बदतल्या काळानुसार महागड्या समजल्या जाणाऱ्या काॅन्टॅक्ट लेन्स उपलब्ध होवू लागल्या आहेत. कधी काळी श्रीमंतीचे लक्षण असल्याची गणना करणारे सामान्यही काॅन्टॅक्ट लेन्सचा वापर करत आहेत. मोतीबिंदू झालेल्या वृद्धांनाही अनेक जण लेन्स टाकून देण्याचा आग्रह करतात. परंतु लेन्सची काळजी कशी घ्यावी याची माहिती न घेताच, त्यांच्याकडून लेन्स लावल्या जात असल्याने समस्या निर्माण होत आहे. यामुळे वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे ठरत आहे.
चष्म्याला करा बाय बाय...
नाकावरचा अवजड चष्मा नको म्हणून महाविद्यालयीन युवक-युवती तसेच नोकरदार मंडळी काॅन्टॅक्ट लेन्सचा आग्रह धरतात. डोळ्यात सहज मावणारी लेन्स दृष्टीहिनतेवर मात करत असल्याने त्यास सर्वाधिक पसंती दिली जाते. विविध कंपन्यांच्या लेन्स सध्या बाजारात उपलब्ध आहेत. नेत्रतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार ह्या लेन्स वापरणे आवश्यक आहे. नेत्रतज्ञ डोळ्यातील दृष्टीच्या क्रमांकानुसार लेन्स वापरावी किंवा कसे हे सुचवत आहेत. एखाद्या व्यक्तीच्या दृष्टीत दोष असल्यास लेन्ससोबत चष्मा वापरण्याचेही सुचवले जाते. या लेन्सचा अधिक काळ वापर शक्य नसल्याने त्या वापरण्याचे प्रात्यक्षिक करूनच लेन्स वापरल्या पाहिजेत असे मत, नेत्रतज्ज्ञांनी व्यक्त केले.
लेन्स लावण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. नेत्रतज्ञांच्या सल्ल्यानुसार तिचा वापर केला पाहिले. सहा तासांपेक्षा अधिक काळ लेन्सचा वापर केल्यास डोळ्याच्या बुब्बुळांना अपाय होण्याची शक्यता असते. बुब्बुळांपर्यंत ऑक्सिजन पोहोचवा यासाठी सहा तासांनी ते योग्य पद्धतीने काढून पुन्हा लावावे.
-डाॅ. वसंत पाटील,
नेत्रतज्ञ, शहादा.
नागरीकांनी डोळ्यांची निगा राखत योग्य त्या पद्धतीने लेन्सवचा वपर केला पाहिजे. नेत्रतज्ञांच्या सल्ल्यानुसार त्या विकत घेवून त्यांचा वापर कसा करावा याची माहिती हवी. याेग्य पद्धतीने लेन्सचा वापर न केल्यास डोळ्यास सूज येण्याचे प्रकार होवू शकतात.
-विजय इंदवे,
ऑप्थॅलमिस्ट, नंदुरबार.
लेन्सचा डोळ्यात टाकण्यापूर्वी वापरकर्त्याने आपले हात हे स्वच्छ केले पाहिजे. लेन्स काढताही आधी हात स्वच्छ करणे गरजेचे आहे. हातातील विषाणू लेन्सवर गेल्यास कालांतराने डोळ्यांना इजा होण्याची शक्यता अधिक असते. प्रवास करताना किंवा घराबाहेर असताना लेन्सचा वापर कमी प्रमाणात होईल याची दक्षता घेणेही गरजेचे आहे.
डोळ्यात लेन्स टाकण्यापूर्वी वापरले जाणारे सोल्यूशन हे वेळोवेळी बदल करणे गरजेचे आहे. सोल्यूशनचा वापर कसा करावा याची माहिती वैद्यकीय तज्ज्ञांकडून घेतली पाहिजे. लेन्स घालून दुचाकीने प्रवास करताना डोळ्यावर चांगल्या दर्जाचा चष्मा किंवा काळा गाॅगल यांचा वापर केल्यास होऊ शकणारा संसर्ग कमी होणार आहे.