अवकाळी पावसाने ऊस तोडीला ‘ब्रेक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:24 IST2021-01-10T04:24:35+5:302021-01-10T04:24:35+5:30
रांझणी - तळोदा तालुक्यातील रांझणीसह प्रतापपूर व चिनोदा परिसरात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत असल्याने ऊस तोडीला पुन्हा ...

अवकाळी पावसाने ऊस तोडीला ‘ब्रेक’
रांझणी - तळोदा तालुक्यातील रांझणीसह प्रतापपूर व चिनोदा परिसरात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत असल्याने ऊस तोडीला पुन्हा ‘ब्रेक’ लागला आहे. गेल्या पंधरवड्यातही अवकाळी पावसाचे आगमन झाले होते. त्यावेळीही ऊसतोड थांबली होती. त्यानंतर शेतकऱ्यांनी पुन्हा आपल्या शेतापासून ते मुख्य रस्त्यापर्यंतच्या मार्गावर भराव करून ऊस वाहतूक सुरळीत केली होती. परंतु, पावसाने दोन दिवस सतत जोरदार हजेरी लावल्याने ऊसाचे क्षेत्र व भराव केलेले रस्ते पुन्हा जलमय झाले असून, ऊसतोड पुन्हा थांबणार आहे. दरम्यान, ऊसतोडीसाठी पुन्हा विलंब होत असल्याने गहू पेरणीसाठी इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांना आता दुसऱ्या रब्बी पिकांची लागवड करावी लागणार आहे. दरम्यान, तूर्तास ऊसतोड झाली तरीही शेताची मशागत करून गहू पेरणी करण्यास उशीर होऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे.
ग्रामपंचायत निवडणुकांचाही अडथळा
अवकाळी पावसामुळे ऊसतोड थांबली असली, तरी त्यातच ग्रामपंचायत निवडणुका असल्याने बहुतांश ऊसतोड कामगार आपापल्या गावाकडे परतणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे किमान आठवडाभर तरी ऊसतोडीला ‘ब्रेक’ लागू शकतो, असा अंदाज वर्तविला जात आहे. अवकाळी पावसामुळे ऊसतोड कामगारांच्या संसारोपयोगी साहित्याचेही नुकसान झाले आहे.