नंदुरबारात तीन वर्षात दोन हजार विंधन विहिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 12:53 IST2018-11-18T12:53:06+5:302018-11-18T12:53:19+5:30
नंदुरबार : जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता निम्मे भागात पाणी पुरवठा योजना करणे शक्य नाही. ही बाब लक्षात घेता ...

नंदुरबारात तीन वर्षात दोन हजार विंधन विहिरी
नंदुरबार : जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता निम्मे भागात पाणी पुरवठा योजना करणे शक्य नाही. ही बाब लक्षात घेता सातपुडय़ाच्या दुर्गम भागासह अनेक ठिकाणी केवळ विंधन विहिरीवरच पिण्याच्या पाण्याची सोय भागवावी लागत असल्याचे चित्र आहे. हीच बाब लक्षात घेता जिल्हा परिषदेने विविध योजनांच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षात तब्ब दोन हजार 212 विंधन विहिरींचे काम केले आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या काही अंशी सुटण्यास मदत झाली आहे. यंदाच्या दुष्काळात या विंधन विहिरी आसरा ठरणार आहेत.
नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव, अक्कलकुवा व तळोदा तालुक्यातील 80 टक्के भाग हा दुर्गम भागात मोडतो. याशिवाय शहादा व नवापूर तालुक्यातील 30 टक्के भागात अशीच स्थिती कमी अधीक प्रमाणात आहे. ही बाब लक्षात घेता पाणी पुरवठा योजना राबवितांना मोठय़ा प्रमाणात अडचणी निर्माण होतात. त्यामुळे विंधन विहिरी घेण्याकडेच सर्वाधिक कल असतो. गेल्या तीन वर्षाचा विचार करता तब्बल दोन हजारापेक्षा अधीक ठिकाणी विंधन विहिरी घेण्यात आल्या आहेत. त्यावर कोटय़ावधींचा खर्च झाला आहे.
जिल्हा परिषदेने आपल्या विविध योजनांच्या माध्यमातून या विंधन विहिरी केल्या आहेत. गेल्या तीन वर्षाचे चित्र पहाता 2015-16 मध्ये टंचाई कृती आराखडय़ाअंतर्गत 495 विहिरी मंजुर करण्यात आल्या होत्या. पैकी 433 पुर्ण झाल्या. आमदार स्थानिक विकास कार्यक्रमाअंतर्गत 208 विहिरी घेण्यात आल्या. आदिवासी उपयोजनेअंतर्गत 102 तर डोंगरी विकास कार्यक्रमाअंतर्गत 29 विंधन विहिरी करण्यात आल्या. जवळपास चार कोटी रुपये त्यासाठी खर्च करण्यात आला.
2016-17 मध्ये टंचाई अंतर्गत 396 विंधन विहिरी मंजूर करण्यात आल्या. त्यापैकी 364 पुर्ण झाल्या होत्या. आदिवासी उपयोजनेअंतर्गत582 पैकी 564 पुर्ण करण्यात आल्या. आमदार स्थानिक विकास कार्यक्रमाअंतर्गत 34 विंधन विहिरी करण्यात आल्या. खासदार स्थानिक विकास कार्यक्रमाअंतर्गत 195 पैकी 193 विहिरी पुर्ण करण्यात आल्या होत्या. त्यावर जवळपास सव्वा पाच कोटी रुपये खर्च करण्यात आला.
गेल्या वर्षी अर्थात 2017-18 मध्ये आदिवासी उपयोजनेअंतर्गत 500 विंधन विहिरी मंजुर करण्यात आल्या होत्या. त्यापैकी 248 पुर्ण झाल्या. आमदार स्थानिक विकास अंतर्गत 37 विंधन विहिरी पुर्ण झाल्या आहेत. त्यावर एकुण साडेतीन कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.
यंदाच्या वर्षात टंचाई कृती आराखडय़ाअंतर्गत 302 विंधन विहिरी घेतल्या जाणार आहेत.
याशिवाय जिल्हा परिषदेने दुहेरी पंप योजनेअंतर्गत 154 सौरपंप मंजुर केले होते. त्यावर चार कोटी 69 लाख रुपये खर्च अपेक्षीत असून त्यांची कामे देखील पुर्णत्वाच्या मार्गावर आहेत.
हातपंप बसविण्यास उशीर
अनेक भागात विंधन विहिरी घेतल्या जात असल्या तरी त्यावर हातपंप बसविण्याबाबत मात्र बरीच उदासिनता दिसून येते. शिवाय हातपंप बसविल्यानंतर नादुरूस्त झाल्यावर त्यांच्या दुरूस्तीकडे देखील फारसे लक्ष दिले जात नसल्याची स्थिती आहे. दुर्गम भागात हे चित्र प्रकर्षाने दिसून येते.
यंदा दुष्काळामुळे अनेक अडीचशे गावे व सव्वादोनशे पाडय़ांवर पाणी टंचाई जाणवणार आहे. अशा ठिकाणी या विंधन विहिरी आशादायी चित्र निर्माण करणा:या असल्या तरी त्यांच्या पाण्याची पातळी देखील खोल गेल्याने मोठी समस्या निर्माण होणार आहे.