विजेचे खांब घेऊन जाणारे भरधाव ट्रॅक्टर उलटल्याने दोनजण ठार
By मनोज शेलार | Updated: March 31, 2024 17:03 IST2024-03-31T17:03:25+5:302024-03-31T17:03:43+5:30
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विजेचे खांब घेऊन मंदाण्याकडे ट्रॅक्टर जात होते. त्यावर मजूर देखील बसले होते.

विजेचे खांब घेऊन जाणारे भरधाव ट्रॅक्टर उलटल्याने दोनजण ठार
नंदुरबार : विजेचे खांब घेऊन जाणारा ट्रॅक्टर उलटल्याने त्याखाली दाबले जाऊन दोनजण ठार झाल्याची घटना शहादा-मंदाणा रस्त्यावर कोळपांढरी दरम्यान शनिवारी सायंकाळी घडली. याबाबत शहादा पोलिसात अपघातान्वये नोंद करण्यात आली आहे. अपघातात मयत झालेल्यांमध्ये श्रावण भीमराव मोहिते (४२) व प्रवीण भिला बिडकर (४१) रा. उजळोद, ता. शहादा यांचा समावेश आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विजेचे खांब घेऊन मंदाण्याकडे ट्रॅक्टर जात होते. त्यावर मजूर देखील बसले होते. कोळपांढरी नजीक भरधाव ट्रॅक्टरवरील चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे विजेचे खांब ठेवलेली ट्रॉली रस्त्याच्या खाली उलटली. त्याखाली श्रावण मोहिते व प्रवीण बिडकर हे दाबले जाऊन गंभीर जखमी झाले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर तातडीने परिसरातील नागरिकांनी मदतकार्य केले. दोघांच्या मृतदेहाचे शहाद्याच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
याबाबत समाधान अर्जुन मोहिते, रा. उजळोद, ता. शहादा यांनी फिर्याद दिल्याने ट्रॅक्टर चालक ईश्वर नरोत्तम पाटील, रा. लोणखेडा, ता. शहादा याच्याविरुद्ध शहादा पोलिसात अपघातान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रतापसिंग मोहिते करीत आहे.