भाविकांचे श्रद्धास्थान असलेले तुळजाभवानी व सप्तशृंगी माता मंदिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 11:55 IST2019-09-29T11:54:57+5:302019-09-29T11:55:02+5:30
सुनील सोमवंशी । लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : महाराष्ट्राचे कुलदैवत माता तुळजाभवानी आणि खान्देशची कुलस्वामीनी माता सप्तशृंगी यांच्या शहाद्यातील ...

भाविकांचे श्रद्धास्थान असलेले तुळजाभवानी व सप्तशृंगी माता मंदिर
सुनील सोमवंशी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : महाराष्ट्राचे कुलदैवत माता तुळजाभवानी आणि खान्देशची कुलस्वामीनी माता सप्तशृंगी यांच्या शहाद्यातील मंदिरांनी नवरात्रोत्सवाचा उत्साह वाढविला आहे.
शहरात पाच देवींची मंदिरे असून साडेतीन शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ म्हणून मान्यता पावलेल्या तुळजाभवानी माता व अर्धेशक्तीपीठ म्हणून मान्यता पावलेल्या माता सप्तशृंगी देवीसोबतच अंबाजी देवी, गायत्री माता आणि हिंगलाज माता या पाच देवींची सुंदर मंदिरे आहेत. शहराच्या प्रवेशद्वारालगतच माता सप्तशृंगीदेवी व माता तुळजा भवानी देवीच्या मंदिराने शहरातील धार्मिक वैभवात भर घातली आहे.
सप्तशंृगीदेवीचे दोंडाईचा रोडवरील सुंदर मंदिर 1990 साली बांधले गेले. या मंदिरात सुमारे एक टन वजनाची आणि साडेचार फूट उंचीची भगवतीची पांढरीशुभ्र बोलकी मूर्ती आहे. जयपूर (राजस्थान) येथून ही मूर्ती तयार करण्यात आली होती. विविध शस्त्रांसह 18 भूजा असलेली ही मूर्ती अतिशय रेखीव आहे. माजी नगराध्यक्ष स्व.काशिनाथ पाटील व तत्कालीन मुख्याधिकारी हनुमंत भोंगळे यांचा या मंदिर निर्माण कार्यात सिंहाचा वाटा होता. स्व.गोविंदराम अग्रवाल यांनी या मंदिरासाठी जागा मंदिर ट्रस्टला दिली आहे. 30 एप्रिल 1990 रोजी देवीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी शतचंडी यज्ञ करण्यात आला होता. स्व.पी.के.अण्णा पाटील व हनुमंत भोंगळे यांनी सपत्नीक अरणी मंथनाने या यज्ञासाठी अग्नी प्रज्वलीत केला होता. या यज्ञासाठी पाच यजमान सपत्नी तीन दिवस पूजेस बसले होते. तर 25 ब्राrाणांकडून हा यज्ञ करण्यात आला होता.
सप्तशृंगी माता मंदिराजवळच महाराष्ट्राचे कुलदैवत माता तुळजा भवानीचे सुंदर मंदिर आहे. दिनदयाल नगर परिसरात 1993 साली हे मंदिर उभारण्यात आले होते. शहादा येथील स्व.अॅड.प्रकाश साबळे व माजी नगरसेवक लक्ष्मण कदम यांच्या परिश्रमातून हे मंदिर निर्माण झाले आहे. 29 एप्रिल 93 रोजी मोठय़ा उत्साहात तुळजा भवानी देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली होती.
या मंदिरील माता तुळजा भवानीची मूर्ती ही हुबेहूब तुळजापूर येथील मूर्तीची प्रतिकृती आहे. एकाच काळ्या दगडात कोरलेल्या या मूर्तीवर उजव्या बाजूस सिंह असून, डाव्या बाजूस तपस्वीनी उलटे टांगून घेऊन तपश्चर्या करीत आहेत. मूर्तीवर मार्केडेय ऋषी पुराण सांगत असलेली प्रतिमा कोरली आहे. देवीने मस्तकी स्तंभ धारण केला आहे. डाव्या स्कंधाजवळ सूर्य आहे तर उजव्या स्कंधाजवळ चंद्र आहे. हातात विविध शस्त्रे आहेत. डाव्या हाताने त्याच्या बरगडीत त्रिशूल खुपसला आहे. पायाखाली रेडय़ाचे शव आहे. ही सुंदर आणि एकाच दगडात कोरलेली ही मूर्ती आहे.
नवरात्रोत्सवात सप्तशृंगी मंदिर ते तुळजाभवानी मंदिरार्पयत संपूर्ण परिसर भक्तांच्या गर्दीने फुलतो. उत्साह वाढतो. या दोन्ही मंदिरावर मंदिर ट्रस्टतर्फे भाविकांना सुविधा पुरविल्या जातात.