दुर्गम भागातील वाहतूक धोकेदायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 12:53 IST2019-08-14T12:52:59+5:302019-08-14T12:53:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रांझणी : तळोदा तालुक्यातील हलालपूर गावाजवळील फरशी पूल तुटल्याने मोठे भगदाड पडले आहे. या तुटलेल्या पुलावरुन ...

दुर्गम भागातील वाहतूक धोकेदायक
लोकमत न्यूज नेटवर्क
रांझणी : तळोदा तालुक्यातील हलालपूर गावाजवळील फरशी पूल तुटल्याने मोठे भगदाड पडले आहे. या तुटलेल्या पुलावरुन वाहणा:या पाण्यातून जीव धोक्यात टाकून वाहनधारकांना मार्गक्रमण करावे लागत आहे. या पुलाची व रस्त्याची तात्पुरती का होईना दुरुस्ती करण्याची मागणी धवळीविहीर ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
हलालपूर गावाजवळील नदीवरील फरशीपूल गेल्या आठ-दहा दिवसांपासून पूर्णत: तुटल्याने पुलाचे सर्व पाईप बंद झाले आहेत. पाईपातून पाणी न वाहता रस्त्यावरुन गुडघाभर पाणी वाहत आहे. त्यामुळे गेल्या आठवडाभरापासून दळणवळण ठप्प झाले आहे. त्यातच या नदीला दररोज पूर येत असल्याने पर्यायी मार्ग हा बुधावल रस्त्याला जोडला जातो. परंतु या रस्त्याचेही नुकतेच खडीकरण झाले असून मोठमोठे खड्डे पडले असल्याने वाहनधारकांना कसरत करीत वाहने काढावी लागतात. हलालपूर रस्त्यावरील फरशी पुलावरील सर्व पाईप मोकळ करण्यात येऊन भगदाड पडलेल्या ठिकाणी भराव करण्यात यावा. जेणेकरुन या मार्गावरुन वाहने ये-जा करू शकतील. तसेच गणेश बुधावल रस्त्यावरुन धवळीविहीरकडे जाणा:या रस्त्यावरील खड्डेही मुरुम टाकून बुजण्यात यावेत.
या मार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी तातडीने उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा इशाराही ग्रामस्थांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर अॅड.दारासिंग पावरा, भगवानसिंग मोरे, धनसिंग पावरा, मणिलाल पावरा, बिपीन पावरा, गोविंदा पावरा व ग्रामस्थांच्या सह्या आहेत.