Three motorcyclists arrested | चार मोटारसायकलींसह तिघांना अटक
चार मोटारसायकलींसह तिघांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहर व परिसरातील मोटरसायकलींची चोरी करून त्याची विक्री करणाऱ्या तिघांना शहादा पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या ताब्यातून चार मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या टोळीकडून चोरीच्या घटना उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. गेल्या काही महिन्यापासून शहरात मोटरसायकली चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली होती. यामुळे नागरिकही हैराण झाले होते.
शहादा शहरात होणाºया मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा बसण्यासाठी पोलीस निरीक्षक के.एल. नजनपाटील यांनी एक स्वतंत्र पथक तयार केले. या पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी शहादा शहरात तसेच प्रकाशा गावात गस्त करीत असतांना माहिती मिळाली की, प्रकाशा गावालगत अंकलेश्वर हायवेजवळील एका हॉटेलवर एक जण नंबर प्लेट नसलेली मोटारसायकल विक्री करण्याच्या उद्देशाने आलेला आहे, अशी बातमी मिळाली. पथकातील कर्मचारी हवालदार जे.एम. शेरन, गौतम बोराळे, वंतू गावीत, विकास कापुरे, देवराम गावीत, प्रकाश तमखाने, अफसर शाह, अनमोल राठोड, पंकज जिरेमाळी, शोएब शेख यांनी लागलीच प्रकाशा येथे सापळा लावून या संशयित इसमास त्याच्याजवळील एक लाल काळ्या रंगाच्या मोटारसायकलसह ताब्यात घेतले. तेव्हा त्यास त्याचे नाव व गाव विचारले असता त्याने आपले नाव विक्रम गोट्या पाडवी रा.हाकडीकेली पो.काकडदा, ता. धडगाव असे सांगितले. त्याला अधिक विचारपूस केली असता त्याने शहादा शहरात विविध ठिकाणाहून चोरी केलेल्या इतर चार मोटारसायकली अर्जुन संजय कोळी व शिवनाथ पिंटू भिल दोन्ही रा.प्रकाशा, ता.शहादा यांना दिल्या असल्याचे सांगितले. तेव्हा अर्जुन संजय कोळी व शिवनाथ पिंटू भिल यांनाही पोलीस ठाण्यात आणून विचारपूस केली असता त्यांनी चार मोटारसायकली काढून दिल्या. गेल्या काही महिन्यात शहरात मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली होती. या घटनेमागे प्रशिक्षित टोळी असण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र चोरटे पोलीस कारवाईपासून दूर होते. या तिघा संशयितांना मंगळवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Web Title: Three motorcyclists arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.