मारहाणप्रकरणी तिघांना सश्रम कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 12:11 IST2019-05-06T12:11:35+5:302019-05-06T12:11:54+5:30
तिघे पिता-पुत्र : अंगणात थुंकल्याचा होता वाद

मारहाणप्रकरणी तिघांना सश्रम कारावास
नंदुरबार : अंगणात थुंकल्याच्या कारणावरून तिघांनी वृद्ध दाम्पत्यास मारहाण केल्याप्रकरणी तिघांना तीन सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा तळोदा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी सुनावली.
मोरवड, ता.तळोदा येथील सेवानिवृत्त शिक्षक प्रभाकर नारायण वळवी यांच्या अंगणात शेजारी राहणारी महिला चंद्रभागाबाई राजेंद्र वळवी या थुंकल्या. याबाबत प्रभाकर वळवी यांची पत्नी जयाबाई यांना जाब विचारला. त्यावरून त्यांच्यात भांडण झाले. त्याच दिवशी रात्री चंद्रभागाबाई, त्यांचा पती राजेंद्र नारायण वळवी, मुलगा संदीप राजेंद्र वळवी व मनिष राजेंद्र वळवी यांनी पुन्हा वाद घालत घरात घुसून प्रभाकर वळवी, जयाबाई वळवी, सिमा वळवी यांना बेदम मारहाण केली. गल्लीतील लोकांनी त्यांना सोडविले. याबाबत तळोदा पोलिसात राजेंद्र वळवी, संदीप वळवी, मनिष वळवी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जमादार राजेंद्र बिºहाडे यांनी तपास करून तळोदा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम.जी.मोरे यांच्या कोर्टात या खटल्याची सुनावणी झाली. साक्षी, पुरावे लक्षात घेता न्या.मोरे यांनी राजेंद्र, संदीप व मनिष वळवी यांना दोषी ठरवत भादवी ३२३ प्रमाणे तीन महिने व भादवी ४५२ प्रमाणे सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे अॅड.धिरजसिंह चव्हाण यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून जमादार अनंत गावीत होते.