मलगाव ते सटीपाणी रस्त्याचे काम पूर्ण होण्याआधीच तीनतेरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:34 IST2021-08-24T04:34:17+5:302021-08-24T04:34:17+5:30
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील अतिदुर्गम व डोंगराळ आदिवासी भागातील गाव व पाड्यांना जोडणारा मलगाव ...

मलगाव ते सटीपाणी रस्त्याचे काम पूर्ण होण्याआधीच तीनतेरा
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील अतिदुर्गम व डोंगराळ आदिवासी भागातील गाव व पाड्यांना जोडणारा मलगाव ते सटीपाणी हा सात किलोमीटरचा रस्ता आहे. शिरपूर तालुक्याकडून वाडी-चिकसे ते सटीपाणी या रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत काही वर्षांपूर्वीच पूर्ण झाले आहे. मात्र, सटीपाणी ते मलगाव हा नंदुरबार जिल्हा व शहादा तालुक्याला जोडणारा रस्ता नदी-नाल्यातून व डोंगराळ, तसेच जंगलातून जात असल्याने सटीपाणी हे गाव तालुका व जिल्ह्याच्या संपर्कात येत नसल्याने येथील आदिवासी बांधवांची वर्षानुवर्षे पायपीट सुरू होती. सटीपाणी येथील विद्युतीकरणाच्या उद्घाटनासाठी तत्कालीन आमदार व आताचे पालकमंत्री ॲड. के.सी. पाडवी हे मलगाव येथून मोटारसायकलीने सटीपाणी याठिकाणी पोहोचले होते. तेव्हा तेथील समस्यांचे दर्शन आमदारांना घडले होते. अखेर सटीपाणी ते मलगाव या सात किलोमीटर रस्त्याचे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत चार कोटी २२ लाख रुपये खर्चाच्या कामास मंजुरी मिळाली व फेब्रुवारी २०१७ पासून कामास प्रारंभही झाला. मात्र, हा रस्ता वनक्षेत्रातून जात असल्याने काम सुरू होण्यास अडचणी आल्या होत्या. वनविभागाच्या सर्व प्रकारच्या मंजुरी मिळाल्यानंतर रस्त्याच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झाली. मात्र, ठेकेदार व अधिकाऱ्यांच्या संगनमताने रस्त्याचे काम निकृष्ट पद्धतीने झाल्याने रस्त्याचे बारा वाजले आहेत. तांत्रिकदृष्ट्या सदोष पद्धतीने काम झाल्याने अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत.
मोऱ्यांची कामे अपूर्ण
या रस्त्यावरील अनेक नदी-नाल्यांवर पूल व पाइप मोऱ्यांची कामे अद्यापही अपूर्णावस्थेत आहेत. अनेक ठिकाणी मोऱ्यांसाठी रस्त्यावर गेल्या दोन वर्षांपासून चाऱ्या खोदण्यात आल्या आहेत. मात्र, तेथे पाइप टाकले जात नसल्याने चाऱ्यांमुळे वाहन रस्त्यावरून जाऊ शकत नाही. सध्या पावसाळा सुरू असल्याने व खोदलेल्या चाऱ्यामुळे पर्यायी मार्गाने चिखलातून लोकांना आपल्या वाहनाने यावे-जावे लागत आहे. त्यामुळे अनेकदा वाहने चिखलात फसतात, घसरतात व लहान-मोठे अपघात होतात. लाखो रुपये खर्च करूनही आदिवासी बांधवांना या रस्त्यावरून जाणे कसरतीचे ठरत असल्याने ठेकेदाराच्या व संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे प्रचंड संताप व्यक्त होत आहे. या रस्त्यावर काही ठिकाणी पुलाचे काम झाले; परंतु पुलावर दोन्ही बाजूला कठडे बांधले नसल्याने वाहनधारक रात्री-बेरात्री पुलावरून पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. अपघात होऊन जीवितहानी झाल्यास यास जबाबदार कोण राहील, ठेकेदार की बांधकाम विभाग, असा प्रश्न उपस्थित होत आहे.