Vidhan Sabha 2019: भाजपमध्ये उमेदवारीसाठी होतेय रस्सीखेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 12:24 IST2019-09-30T12:24:42+5:302019-09-30T12:24:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ हा पुनर्रचनेआधी तळोदा व अक्कलकुवा हे दोन्ही तालुके मिळून होता. कै.दिलवरसिंग ...

Vidhan Sabha 2019: भाजपमध्ये उमेदवारीसाठी होतेय रस्सीखेच
लोकमत न्यूज नेटवर्क
अक्कलकुवा : अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ हा पुनर्रचनेआधी तळोदा व अक्कलकुवा हे दोन्ही तालुके मिळून होता. कै.दिलवरसिंग पाडवी जनसंघात असेपासून अर्थात सन 1973 पासून भारतीय जनता पक्षाचा गड मानला गेला. 1999 साली हा गड काँग्रेसने आपल्याकडे खेचून आणला होता. सध्या या मतदारसंघाचे नेतृत्व आमदार अॅड.के.सी.पाडवी करीत आहे. यंदा मुख्य पक्षांमध्ये उमेदवारीसाठी मोठी कसरत येथे दिसून येत आहे.
2009 मध्ये या मतदारसंघात मोठा फेरबदल होत अक्कलकवा-धडगाव हे दोन्ही तालुके जोडले गेले. मतदारसंघावर आजर्पयत काँग्रेसने पकड कायम ठेवली आहे. आजर्पयत काँग्रेस आणि भाजप यामध्येच चुरशीची लढत झाली आहे. आघाडीचा उमेदवार म्हणून विद्यमान आमदार अॅड.के.सी. पाडवी यांची उमेदवारी निश्चित झाली असताना भारतीय जनता पक्ष व शिवसेना या दोन्ही पक्षांची युती झाल्यास नेमका हा मतदारसंघ कोणाच्या वाटय़ाला जातो यावर येथील राजकीय समिकरणे अवलंबून राहणार आहेत. दोन्ही पक्ष एकत्र लढल्यास उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडते याचीही मोठी उत्सुकता मतदारसंघात लागून आहे.
अक्कलकुवा हा राज्यातील प्रथम क्रमांकाचा विधानसभा मतदारसंघ असून, अनुसूचित जमातीकरिता राखीव आहे.
या मतदारसंघावर अॅड.के.सी. पाडवी यांनी आपले वर्चस्व अद्यापर्पयत अबाधित राखले आहे. मात्र या मतदारसंघातील राष्ट्रवादीचे विजयसिंग पराडके यांचे भारतीय जनता पक्षामध्ये इनकमिंग झाले आहे. 2014 च्या निवडणुकीत अॅड.के.सी. पाडवी आणि विजयसिंग पराडके यांच्यात चुरशीची लढत रंगली होती. ते आता भाजपकडे गेले आहेत. मतदारसंघात लोकसभेमध्ये खासदार हीना गावीत यांना काही मतांची आघाडी मिळाली आहे, हे विशेष.
भाजप व शिवसनेने हा मतदारसंघ आपल्याला सुटावा यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. भारतीय जनता पक्षाकडून नागेश पाडवी, राष्ट्रवादीतून आलेले विजयसिंग पराडके, किरसिंग वसावे, शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी, काँग्रेसतर्फे एकमेव अॅड.के.सी.पाडवी हे इच्छुक आहेत.
काँग्रेस, भाजप, शिवसेना, एमआयएम, रा.स.प. अशी बहुरंगी लढत होणार असल्याचे चित्र आहे.
मतदारसंघ कुणाला सुटतो याकडे लक्ष : भाजप-सेना युतीचा तिढा अद्यापही सुटू शकलेला नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार अॅड.के.सी. पाडवी निश्चित मानले जात आहे. युतीमध्ये हा मतदारसंघ भाजपला सुटतो की शिवसेनेला मिळतो यावरच इच्छुक उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे. युतीच्या निर्णयावर या मतदारसंघातील विधानसभेची लढत अवलंबून राहणार आहे.
स्थानिकसह बाहेरील उमेदवाराचीही चर्चा.. : अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षामध्ये इच्छुकांची संख्या वाढल्याने उमेदवारी नेमकी कुणाला मिळते याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. स्थानिक उमेदवारांसह बाहेरील उमेदवाराचीही चर्चा जोरात आहे. त्यामळे या ठिकाणी रस्सीखेच कायम राहणार आहे. त्यातून बंडखोरी अटळ मानली जात आहे. गेल्या निवडणुकीतदेखील भाजपअंतर्गत बंडखोरी झाली होती. त्याचा फायदा काँग्रेसला झाला होता. यंदा काय आणि कसे गणित राहते ? यावरच बरेच काही अवलंबून राहणार आहे. त्यादृष्टीने दोन्ही पक्षांनी अतिशय सावधगिरीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
शिवसेनाही जागा सुटावी यासाठी आग्रही.. : शिवसेनाही या जागेसाठी आग्रही असून, जिल्हा प्रमुख आमश्या पाडवी यांनीही वरिष्ठांकडे या जागेवर हक्क दर्शविला आहे. गेल्या पाच वर्षापासून ते यासाठी मेहनत घेत आहेत. जिल्ह्यात एक मतदारसंघ शिवसेनेला सुटणार असल्याच्या चर्चा असल्यामुळे काय निर्णय होतो, काय राजनीती खेळली जाते यावर सर्वाच्या नजरा आहेत. शिवाय जागा नाही सुटल्यास अपक्ष उमेदवारी होते काय ? यावरही बरेच काही अवलंबून आहे.
पूर्वीच्या तळोदा-अक्कलकुवा मतदारसंघावर जनसंघ व भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व होते. 1972 साली कै.दिलवरसिंग पाडवी प्रथम निवडून आले. सलग 23 वर्षे त्यांचे वर्चस्व होते. त्यांच्या मृत्यूनंतर डॉ.नरेंद्र पाडवी 1995 साली निवडून आले होते. पुनर्रचनेनंतर अॅड.पद्माकर वळवी व अॅड.के.सी. पाडवी यांच्या नेतृत्वात हा मतदारसंघ काँग्रेसच्याच वर्चस्वाखाली आहे.
या मतदारसंघाचे नेतृत्त्व करणारे अॅड.के.सी.पाडवी हे लोकसभेत काँग्रेसचे उमेदवार होते. या मतदारसंघातून त्यांना मोठय़ा मताधिक्याची अपेक्षा होती. परंतु ती अपेक्षा फोल ठरली. भाजपच्या डॉ.हिना गावीत यांनी कडवी झुंज दिल्याने अॅड.पाडवी यांना अवघे 159 एवढेच मताधिक्य मिळविता आले. या मतदारसंघात खासदार गावीत यांना 91 हजार 473 मते, अॅड.के.सी. पाडवी यांना 91 हजार 632 मते मिळाली होती. हे पहाता विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे संभाव्य उमेदवार अॅड.के.सी.पाडवी यांना मेहनत घ्यावी लागणार असल्याचे चित्र आहे. त्यादृष्टीने त्यांनी लोकसभा निवडणुकीनंतर मतदारसंघात संपर्क वाढविला होता.
राज्यातील पहिला मतदारसंघ असल्यामुळे सहाजिकच अनेकांच्या नजरा या मतदारसंघाकडे असतात. थेट नर्मदेच्या काठापासून ते गुजरात हद्द आणि दुर्गम भाग हे या मतदारसंघाचे वैशिष्टय़ मानता येईल.
2014 च्या निवडणुकीत मतदार संघात एकूण 2 लाख 47 हजार, 056 मतदार होते. यापैकी पुरुष 1,24,760 तर स्त्री 1,22,295 अशी वर्गवारी होती.
2019 च्या होऊ घातलेल्या निवडणुकीत मतदारांची संख्या 3363 इतकी वाढली आहे. या निवडणुकीसाठी 2,77,917 मतदारांची नोंद झाली असून, पुरुष 1,39,889 तर महिला मतदार 1,38,028 आहे.