साहेब तुम्हीच सांगा, कसं जगायचं... कसं शिकायचं ! प्रशासन चेष्टा करून निघून गेले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 08:46 IST2025-07-10T08:46:13+5:302025-07-10T08:46:27+5:30
केलखाडीत आलेले जेसीबी एका दिवसात गेले माघारी

साहेब तुम्हीच सांगा, कसं जगायचं... कसं शिकायचं ! प्रशासन चेष्टा करून निघून गेले
रमाकांत पाटील
नंदुरबार : नदीवर पूल नसल्याने जीव मुठीत घेऊन फांदीवरून नदी पार करणाऱ्या ग्रामस्थ व शाळकरी विद्यार्थ्यांची समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने जेसीबी तर पाठविले पण एका दिवसातच ते माघारी गेल्याने आता पूल होणार की नाही असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. पूल आणि रस्त्याअभावी झोळीतून आरोग्य केंद्रात रूग्ण नेताना गेल्या दोन वर्षात याच ठिकाणी तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर या जीवघेण्या कसरतीमुळे शाळेतील पटसंख्याही घटली आहे.
सातपुड्याच्या पहिल्याच रांगेत केलखाडी हे गंगापूर ग्रामपंचायत अंतर्गत येणारे गाव. या गावाला ग्रामपंचायतीपासून तर शाळा, आरोग्य केंद्र, बाजार हाट तसेच तालुका ठिकाणावर जायचे असेल तर किमान पाच किलोमीटरची डोंगर उताराच्या रस्तावर पायपीट करून तसेच नदी ओलांडून जावे लागते. पहाडातून उतारावरून ही नदी वाहत असल्याने पाण्याचा प्रवाहाचा वेग अधिक असतो. रुग्णालाही झोळीत टाकून आणावे लागते. गेल्या दोन वर्षात वेळीच उपचार न मिळाल्याने झोळीत आणणाऱ्या रुग्णांपैकी दोन सर्पदंश झालेले आणि एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे. तर काही महिन्यापूर्वीच एका गर्भवती महिलेची रस्त्यावरच प्रसूती करण्याची वेळ आली होती.
अभियंत्यांचा जत्था आला, पण काहीच हालचाल नाही
या समस्येचे छायाचित्र ‘लोकमत’ने ३० जूनला प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासनाने तत्काळ दखल घेतली. अभियंत्यांचा जत्था आला. सर्वेक्षणाचे चित्र रंगवले. जेसीबी
आणून काम सुरू केले. मात्र दुसऱ्याच दिवशी हे जेसीबी कुठे गेले ते ग्रामस्थांनाही माहिती नाही. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी देखील त्याठिकाणी गेले. झोळीतून रुग्ण घेऊन जाताना त्यांनी पाहिले. जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने बैठक बोलावून २७ कोटी खर्चून ६० ठिकाणी साकव बांधण्याचा निर्णय घेतला. प्रत्यक्षात १० दिवसानंतर येथे भेट दिली असता तेथे कुठल्याही हालचाली नसल्याचे चित्र आहे.
केलखाडी येथे साकव बांधण्याला आजच आपण प्रशासकीय मंजुरी दिली असून, त्याचे टेंडर काढण्याचीही सूचना केली आहे. तत्काळ तेथे काम सुरू होईल. ग्रामस्थांना तात्पुरती तत्काळ काही सुविधा करता येईल का, याबाबत सूचनाही आपण दिल्या आहेत. - डॉ.मित्ताली सेठी, जिल्हाधिकारी, नंदुरबार
वर्षानुवर्षे आम्हाला पावसाळ्यात जीवमुठीत घेऊन फांदीचा आधार घेत यावे लागते. या कसरतीमुळे अनेक पालकांनी आपल्या मुलांना परिस्थिती नसतानाही बाहेर शिकायला पाठविले आहे. तर काहींनी शिक्षण सोडले आहे. दोन वर्षांपूर्वी शाळेतील पटसंख्या ४० होती ती आता २१ वर आली आहे. - शिवदास वसावे, ग्रामस्थ, केलखाडी