नवापूर येथे दहा किमी क्षेत्र केले निगराणी क्षेत्र म्हणून घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:27 IST2021-02-08T04:27:33+5:302021-02-08T04:27:33+5:30

नवापूरमधील न्यू डायमंड पोल्ट्री फार्म, परवेझ पोल्ट्री फार्म, आरिफभाई पालवाला वासीम पोल्ट्री फार्म आणि मोहम्मदभाई अब्दुल सलाम आमलीवाला पोल्ट्री ...

Ten km area at Navapur declared as surveillance area | नवापूर येथे दहा किमी क्षेत्र केले निगराणी क्षेत्र म्हणून घोषित

नवापूर येथे दहा किमी क्षेत्र केले निगराणी क्षेत्र म्हणून घोषित

नवापूरमधील न्यू डायमंड पोल्ट्री फार्म, परवेझ पोल्ट्री फार्म, आरिफभाई पालवाला वासीम पोल्ट्री फार्म आणि मोहम्मदभाई अब्दुल सलाम आमलीवाला पोल्ट्री फार्म अशा चार पोल्ट्रीमधील नमुना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ३१ हजार ८३३ पक्ष्यांचा मृत्यू झाला असून, सुमारे आठ लाख ७४ हजार ५९८ पक्षी नवापूर तालुक्यातील विविध पोल्ट्री फार्ममध्ये आहेत. बाधित क्षेत्रातील सर्व कुक्कुट पक्ष्यांची शास्रोक्त पद्धतीने कत्तल करावी आणि निगडित अंडी, पक्षीखाद्य नष्ट करून त्याचीदेखील विल्हेवाट लावण्याचे निर्देश जलद कृती दलाला देण्यात आले आहेत. निगराणी क्षेत्रातील पक्षी, अंडी व पक्षी खाद्य यांचे निगराणी क्षेत्राबाहेर वाहतूक, खरेदी-विक्री, तसेच बाजार, जत्रा व प्रदर्शने आयोजित करण्यास ९० दिवसांपर्यंत प्रतिबंध घालण्यात आला आहे. दहा किमी त्रिज्येच्या परिसरातील गावे प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आली आहेत.

बाधित क्षेत्रातील कत्तल केलेले व नष्ट करण्यात आलेल्या कुक्कुट पक्ष्यांची अंडी व पक्षी यांचा जागेवरच जलद कृती दलासमक्ष पंचनामा करण्यात येऊन त्वरित अहवाल सादर करावा. नुकसानभरपाईसाठी अहवालाची पूर्ण खात्री करून शेतकरी व कुक्कुट व्यावसायिकांना नुकसानभरपाई रक्कम अदा करण्याची कार्यवाही विनाविलंब करण्यात यावी. बाधित क्षेत्रात रिकामे करण्यात आलेले सर्व पक्षिगृहांचे आवश्यक जैवसुरक्षेसह दोन टक्के सोडियम हायपोक्लोरेट, पोटॅशिअम परमँगनेटद्वारे निर्जंतुकीकरण करण्यात यावे. निगराणी क्षेत्राच्या ठिकाणी वाहनाच्या ये-जा करण्यास मनाई करण्यात यावी व त्या ठिकाणची खासगी वाहने प्रसारित क्षेत्राच्या बाहेर लावण्यात यावी. निगराणी क्षेत्रातील जिवंत अथवा मृत पक्षी, अंडी, कोंबडी खत, पशुखाद्य व आनुषंगिक साहित्य व उपकरणे यांच्या वाहतुकीस मनाई करण्यात यावी. व्यावसायिक पोल्ट्री फार्ममध्ये मालक व कर्मचारी यांनी योग्य ती खबरदारी घेऊन कामकाज करावे. फार्म सोडताना स्वत:चे निर्जंतुकीकरण करून घ्यावे. निगराणी क्षेत्रात नागरिकांच्या हालचाली तसेच इतर पक्षी व प्राण्यांच्या वाहतुकीस नियंत्रित करण्यात यावे. निगराणी क्षेत्राचे निर्जंतुकीकरण करण्यात यावे. उघड्यावर मृत पक्षी किंवा कोंबडी टाकू नये. तसेच त्यांची विल्हेवाट शास्त्रीय पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थांनी लावावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली तातडीची बैठक

जिल्हाधिकारी डॉ. भारुड यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. पक्षी शास्रीय पद्धतीने कत्तल करणाऱ्या पथकांना औषधे, पीपीई कीट, मास्क तसेच आवश्यक साहित्य तत्काळ देण्यात यावे. त्यासाठी आरोग्य पथकाची नेमणूक करावी. नियंत्रण कक्षाची तातडीने सुरुवात करण्यात यावी. बाहेरून कुक्कुट पक्षी शहरात येणार नाही याची खबरदारी घ्यावी. पशुसंवर्धन विभागाने परिसरात बर्ड फ्लूबाबत जनजागृती करावी. पोल्ट्री कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचनेनुसार आवश्यक कालावधीसाठी विलगीकरणात ठेवण्यात यावे, असे निर्देश त्यांनी दिले.

बैठकीला अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी संजय बागडे, तहसीलदार उल्हास देवरे आदी उपस्थित होते.

Web Title: Ten km area at Navapur declared as surveillance area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.