वाढत्या रुग्णांमुळे तळोदेकरांना भरली धडकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 12:58 IST2020-08-09T12:58:39+5:302020-08-09T12:58:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : तळोदा शहरातला कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे शहरवासीयांना धडकी भरू ...

वाढत्या रुग्णांमुळे तळोदेकरांना भरली धडकी
लोकमत न्यूज नेटवर्क
कोठार : तळोदा शहरातला कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे शहरवासीयांना धडकी भरू लागली असून नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, शहरातील रुग्णांनी अर्धशतक पूर्ण केले असून त्यापैकी २४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
जुलै महिन्याच्या पंधरवड्यानंतर कोरोनामुक्त झालेल्या तळोदा शहरात पुन्हा नव्याने कोरोना संक्रमण वाढण्यास सुरुवात झाली आहे. तळोदा शहरात सद्यस्थितीत २२ कोरोना बाधित रुग्ण असून त्या सर्वांवर नंदुरबार येथे उपचार सुरू आहेत. राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असताना मे महिन्याच्या अखेरपर्यंत तळोदा शहरात एकही कोरोना बाधित रुग्ण नव्हता. परंतु ठाणे येथून परतलेल्या एका वृद्ध महिलेच्चा संशयास्पदरित्या मृत्यू झाल्याने शहरात कोरोनाचा शिरकाव झाला. या महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या संपर्कात आलेल्या व अंत्ययात्रेत सहभागी झालेल्यांचे स्वब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील त्या महिलेच्या मुलाचा अहवाल १३ जून रोजी पॉझिटीव्ह आला होता व तो तळोदा शहरातील पहिला कोरोनाबाधित रुग्ण ठरला होता. त्यानंतर मृत महिलेच्या कुटुंबातील व संपर्कातील काही व्यक्तीही पॉझिटीव्ह निघाल्या होत्या. अशाप्रकारे दोन-अडीच महिना कोरोनाचा शिरकाव न झालेल्या तळोदा शहरात कोरोना संक्रमणाची साखळी सुरू झाली होती. नंदुरबार येथील कोरोना बाधिताच्या संपर्कात आलेल्या एका दाम्पत्याला व त्यांच्या संपर्कात आलेल्या तिघांनाही कोरोनाची लागण झाली होती. अशाप्रकारे तळोदा रुग्णांची संख्या वाढत जाऊन ती १७ पर्यंत गेली होती. सुदैवाने हे सर्व कोरोना संक्रमित झालेले रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले होते. त्यामुळे तळोदा शहर कोरोनामुक्त झाले होते. परंतु कोरोनामुक्तीचे समाधान तळोदेकरांसाठी काही तासांचे ठरले होते.
तळोदा शहर कोरोनामुक्त व्हायला २४ तास उलटत नाही तोपर्यंत तळोद्यतील दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर तळोदा शहरातील नव्याने सुरू झालेला कोरोना संक्रमित रुग्ण निघण्याचा सुरू झालेला सिलसीला थांबायचे नाव घेत नसून तळोदा शहरातील कोरोनाग्रस्तांचा आतापर्यंतचा आकडा ५० पर्यंत पोहोचला आहे. त्यात २४ जण रुग्ण बरे झाले असून तिघांचा मृत्यू झाला आहे. ५ आॅगस्ट रोजी एकट्या तळोदा शहरात तब्बल १० जणांचे कोरोना अहवाह पॉझिटीव्ह आल्याने शहरात मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यातच ६ आॅगस्टला तळोदा शहरातील भोई गल्लीतील व बढरी कॉलनीतील एका-एका बाधिताचा मृत्यू झाल्याने भीतीच्या वातावरणात अधिकच भर पडली होती. ७ आॅगस्ट रोजी पुन्हा नव्याने तीन रुग्णांची भर पडून अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या २२ वर पोहोचली आहे. या वाढत जाणाºया रुग्ण संख्येची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात असून नागरिकांकडूनही त्याला सूचनांचे पालन करून योग्य प्रतिसाद मिळणे आवश्यक आहे. शहरात कोरोना संक्रमणाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला असून नागरिकांनी अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडून प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे. अजून तब्बल ४३ स्वॅबचे अहवाल प्रतीक्षेत असून त्यांच्याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे.
दरम्यान, असे असले तरी शहरात आढळलेल्या कोरोना बाधितांना नेमके संक्रमण कुठून झाले याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. काहींना नेमका कोरोनाचा संसर्ग झालाच कुठून हे अद्यापही नक्की स्पष्ट होऊ शकलेले नाही. जिल्हात समूह संसर्गाला सुरुवात तर झाली नाही ना? असा प्रश्नही यामुळे उपस्थित केला जात आहे.
तळोदा शहरात कोरोना पॉझिटीव्ह येणाऱ्या रुग्णाच्या संपर्कात येणाºया व्यक्तींना होम क्वारंटाईन करणे व प्रतिबंधात्मक क्षेत्र तयार करणे, निर्जंतुकीकरण करणे आदी बाबींसाठी इनसिडेंट कमांडर तथा उपविभागीय अधिकारी अविशांत पांडा, तहसीलदार पंकज लोखंडे, पालिका मुख्याधिकारी सपना वसावा, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.महेंद्र चव्हाण, पोलीस निरीक्षक राजेश शिंगोटे, नगराध्यक्ष अजय परदेशी यांच्या मार्गदर्शनात आरोग्य, महसूल व पालिका प्रशासन खबरदारी घेऊन परिश्रम घेत आहेत. पालिकेचे स्वच्छता निरीक्षक आश्विन परदेशी यांच्या निगराणीत वेळोवेळी संक्रमित व्यक्तींच्या निवासाचा व कामाच्या परिसरात फवारणी करून परिसर निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.