मोलगी गाव पाच दिवस बंद ठेवत सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 12:37 IST2020-06-16T12:37:06+5:302020-06-16T12:37:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मोलगी : सातपुड्याच्या दुर्गम भागात मोलगी ता़ अक्कलकुवा येथे एकात कोरोनाची लक्षणे आढळली आहेत़ त्याला जिल्हा ...

मोलगी गाव पाच दिवस बंद ठेवत सर्वेक्षण
लोकमत न्यूज नेटवर्क
मोलगी : सातपुड्याच्या दुर्गम भागात मोलगी ता़ अक्कलकुवा येथे एकात कोरोनाची लक्षणे आढळली आहेत़ त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून संपर्कातील सात जण क्वारंटाईन करण्यात आले आहेत़ दरम्यान या पार्श्वभूमीवर मोलगी गाव तीन दिवस बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़
रविवारी मोलगी गावातील शिक्षक कॉलनीत राहणाऱ्या एकात कोरोनाची लक्षणे आढळून आली होती़ तालुका आरोग्य विभागाने तातडीने हालचाली करत संबधिताला नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवत त्याच्या संपर्कात आलेल्या सात जणांना खापर येथील क्वारंटाईन कक्षात नेले आहे़ यानंतर सोमवारी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार विजय कच्छवे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ़ स्वप्नील मालखेडे यांनी मोलगी येथे भेट देत माहिती जाणून घेतली़ दक्षता म्हणून मोलगी येथील काही भाग सील करण्यात आला असून बाजारपेठही बंद ठेवण्यात आली आहे़ सरपंच मनोज तडवी व ग्रामसेवक संजय बागले यांच्या उपस्थितीत गावात जागोजागी फवारणी करण्यात आली़ आरोग्य विभागाने मोलगी येथे आठ पथकांची नियुक्ती केली असून त्यांच्याकडून गावात सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली आहे़ पथकात आरोग्य सेविका, आरोग्य सेवक यांच्यासह आशा कार्यकर्तींचा समावेश करण्यात आला आहे़ गावासह आसपासच्या पाड्यांवर भेटी देत त्यांच्याकडून माहिती घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे़
दरम्यान दुर्गम भागात कोरोनाची लक्षणे असलेला रुग्ण आढळून आल्याने चिंता निर्माण झाली आहे़
मोलगी हे गाव सातपुड्यातील गाव पाड्यांसाठी प्रमुख बाजारपेठेचे ठिकाण आहे़ दीर्घ कालावधीनंतर गावातील व्यवहार पूर्वपदावर येत होते़ परंतू कोरोनाची लक्षणे असलेला व्यक्ती आढळून आल्यानंतर पुन्हा गाव बंद करण्यात आले आहे़ तीन दिवसांनंतर व्यवहार सुरु होणार असल्याचे आसपासच्या पाड्यांवर दवंडी देऊन कळवण्यात आले आहे़