ऑनलाइन शिक्षणामुळे शैक्षणिक साहित्य खरेदीकडे विद्यार्थ्यांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:20 IST2021-06-27T04:20:41+5:302021-06-27T04:20:41+5:30
आष्टे : जून महिना उजाडला की, विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्याचे वेध लागतात. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असल्याने नव्या ...

ऑनलाइन शिक्षणामुळे शैक्षणिक साहित्य खरेदीकडे विद्यार्थ्यांची पाठ
आष्टे : जून महिना उजाडला की, विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्याचे वेध लागतात. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असल्याने नव्या इयत्तेची पाठ्यपुस्तके, वह्या, लेखन साहित्यासह दप्तर, डबा, पाण्याची बाटली या सारख्या सर्वच वस्तूंच्या खरेदीसाठी शहरापासून ते खेड्यापर्यंत, विद्यार्थ्यासह पालकांची लगबग सुरू होते. मात्र, कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षापासून शिक्षण व्यवस्थेचे पूर्ण स्वरूपच बदलून गेले आहे. ऑनलाइन शिक्षणामुळे शैक्षणिक साहित्य विक्रेत्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरवर्षी जून महिन्याच्या सुरुवातीला पालकांसह विद्यार्थ्यांची शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी मोठी झुंबड उडते. परंतु गेल्या वर्षीपासून शाळा, महाविद्यालयांसह बाजारपेठही ठप्प झाल्या होत्या. डिसेंबरअखेरीस कोरोना विषाणूची रुग्णसंख्या कमी होत असल्याने पुढील शैक्षणिक वर्ष सुरळीत जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, या वर्षाच्या फेब्रुवारीअखेरीपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने पुन्हा जनजीवन विस्कळीत केले.
त्यामुळे सगळ्याच गोष्टींवर निर्बंध येऊन बाजारपेठही ठप्प झाल्या. त्यामुळे शाळा महाविद्यालयांचाही खोळंबा झाला व विद्यार्थ्यांना ऑनलाइनचे धडे मिळू लागले. त्यामुळे शैक्षिणक साहित्य खरेदी आपोआप रोडावली. याचा मोठा फटका शैक्षणिक साहित्य विक्रेत्यांना बसला.
लॉकडाऊनमुळे ऑनलाइन शिक्षण सुरू झाले. त्यामुळे ७० टक्के साहित्य खरेदी कमी झाली असून, ठरावीक पालकच शैक्षणिक साहित्य खरेदी करतात. सध्या ऑनलाइन शिक्षणामुळे कम्पास बॉक्स, वह्या पुस्तकांचे कव्हर, नवीन पुस्तके यांना मागणी नाही. तसेच जुने पुस्तके अर्ध्या किमतीत घेऊन ती इतर विद्यार्थ्यांना दिली जात असत. मात्र, सध्या ऑनलाइनमुळे त्याचीही विक्री होत नाही. त्यामुळे शैक्षणिक साहित्य खरेदीवर परिणाम होऊन विक्रेत्यांना मोठा फटका सहन करावा लागत आहे. - आनंद रघुवंशी, स्टेशनरी दुकानदार, नंदुरबार
गेल्या वर्षी शाळा सुरू झाल्या नाहीत. थेट पुढील वर्गात प्रवेश मिळाला. त्यामुळे गेल्यावर्षी घेतलेले शैक्षणिक साहित्य व स्टेशनरी अद्याप तशीच शिल्लक असल्याने नवीन गोष्टी खरेदी करण्याची गरज नाही. ऑनलाइन शिक्षण असल्याने स्टेशनरीचा उपयोग होत नाही. - वेदांत पाटील, नंदुरबार