विद्यार्थी मिळविण्यासाठी धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 12:39 IST2020-08-31T12:38:20+5:302020-08-31T12:39:15+5:30
मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विद्यापीठ एकीकडे अंतिम वर्ष वर्गाची परीक्षा घेण्यासाठी तयारी करीत आहे. दुसरीकडे ...

विद्यार्थी मिळविण्यासाठी धडपड
मनोज शेलार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : विद्यापीठ एकीकडे अंतिम वर्ष वर्गाची परीक्षा घेण्यासाठी तयारी करीत आहे. दुसरीकडे मात्र, द्वितीय व तृतीय वर्ष वर्गाचे अवघे ६० ते ७५ टक्के प्रवेश पुर्ण झाले आहेत. प्रथम वर्ष प्रवेशासाठी मात्र प्राध्यापकांना गावोगावी जाऊन विद्यार्थी शोधण्याची वेळ आली आहे. ग्रामिण भागातील महाविद्यालयांसह शहरी भागातील नामांकित महाविद्यालयांवर ही वेळ यंदा आली आहे. तरीही आॅगस्ट अखेर प्रथम वर्षाचे २५ टक्के प्रवेश देखील पुर्ण झाले नसल्याची स्थिती आहे.
कोरोनामुळे यंदा वरिष्ठ महाविद्यालयाचे प्रथम, द्वितीय वर्ष वर्गाच्या परीक्षा झाल्या नाहीत. प्रथम सत्राच्या परिक्षांमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. निकाल लागून दोन महिने झाले तरी विद्यार्थी महाविद्यालयांमध्ये पुढील वर्गाच्या प्रवेशासाठी येत नाहीत. किंवा आॅनलाईन प्रवेश देखील घेत नसल्याची स्थिती आहे. १२ वी परीक्षेचा निकाल लागून देखील दीड महिना लोटला तरीही प्रथम वर्ष वर्गाच्या प्रवेशासाठी विद्यार्थी येत नसल्याचे चित्र आहे. कला, विज्ञान आणि वाणिज्य या तिन्ही शाखांची सारखीच स्थिती आहे.
आॅनलाईन : पण अडचणी फार
विद्यापीठाने आॅनलाईन प्रवेशासाठीची सोय विद्यार्थ्यांना करून दिली आहे. त्यासाठीची प्रक्रिया देखील सोपी केलेली आहे. परंतु ग्रामिण तसेच सातपुड्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना कनेक्टिव्हिटीची अडचण, प्रक्रिया समजण्यातील अडचणी यामुळे आॅनलाईन प्रवेशाला देखील तब्बल दोन महिने होऊनही अपेक्षीत प्रतिसाद नसल्याची स्थिती आहे. महाविद्यालयांनी द्वितीय व तृतीय वर्ष वर्गात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांशी वैयक्तिक संपर्क साधून प्रवेशाची संमती घेतली आहे. आधीच महाविद्यालयांकडे असलेल्या डाटावरून प्रवेश अर्ज भरण्यात येत आहे. तरीही २५ ते ३० टक्के प्रवेश अद्यापही बाकी आहेत.
अनेक तुकड्या रिक्त राहतील
यंदा प्रथम वर्ग वर्गाच्या अनेक तुकड्या रिक्त राहण्याची शक्यता सर्वच महाविद्यालयांमध्ये राहणार आहे. या तुकड्यांबाबत विद्यापीठ काय निर्णय घेणार याकडेही लक्ष लागून आहे. विज्ञान आणि वाणिज्य शाखेच्या तुकड्यांची अवस्था वाईट राहणार असल्याचे चित्र आतापासूनच दिसून येत आहे. कोरोनामुळे प्रथमच प्राध्यापकांवर विद्यार्थी शोध मोहिम राबवावी लागत आहे.
१२ वी उत्तीर्ण झालेले अनेक विद्यार्थी विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे वळतात. त्यामुळे आधीच महाविद्यालयांना प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची शोधाशोध करावी लागते. यावेळी तर कोरोनाचे संकट आहे. शैक्षणिक वर्ष सुरू झाले, परंतुु शाळा, महाविद्यालये कधी सुरू होतील याची शाश्वती नाही. अनेक कनिष्ठ महाविद्यालयांमधील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी अद्यापही आपले गुणपत्रक आणि एल.सी. नेलेली नसल्याची स्थिती आहे. अशा वेळी पुढील वर्गात प्रवेशाबाबत तर बोलणेच नको अशी स्थिती आहे.
प्रथम वर्ष कला, विज्ञान आणि वाणिज्य वर्गाच्या प्रवेशासाठी प्राध्यापकांना विद्यार्थी शोधण्याची वेळ आली आहे. आतापर्यंत अकरावी कला शाखेत प्रवेशासाठी शिक्षकांना गावोगावी फिरावे लागत होते.
आता वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांना देखील विद्यार्थी शोध मोहिमेवर जावे लागत असल्याचे चित्र आहे. आतापर्यंतच्या शैक्षणिक प्रवासात प्रथमच वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांवर ही वेळ आली असल्याचे अनेक प्राध्यापकांनी कबुल केले.
प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्राध्यापकांकडून विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरून दिला व घेतला जात आहे.
शैक्षणिक शुल्क भरून देणे, महाविद्यालय सुरू झाल्यास एस.टी.पास काढून देणे, पुस्तके उपलब्ध करून देणे, आगामी काळात वसतिगृहात रहावयाचे असल्यास त्याची सोय करून देणे आदी प्रकारचे अमिष दाखविले जात आहे.
यासाठी काही महाविद्यालयांनी प्राध्यापकांना ठराविक गावांचा भाग ठरवून देत विद्यार्थी टार्गेट देखील दिले असल्याचे चित्र आहे.